पीएमपीच्या बंद बस टाकत आहेत कात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : प्रवाशांची वाहतूक करू शकणार नाहीत, अशा अवस्थेत पोचलेल्या पीएमपीच्या 77 बस आता कात टाकू लागल्या आहेत. त्यांची फेरबांधणी सुरू झाली असून, त्यातील 11 बस मार्गावर धावू लागल्या आहेत. 

पुणे : प्रवाशांची वाहतूक करू शकणार नाहीत, अशा अवस्थेत पोचलेल्या पीएमपीच्या 77 बस आता कात टाकू लागल्या आहेत. त्यांची फेरबांधणी सुरू झाली असून, त्यातील 11 बस मार्गावर धावू लागल्या आहेत. 

पीएमपीच्या ताफ्यात गेल्या दोन वर्षांत बंद अवस्थेत 400 बस पोचल्या होत्या. त्या सुरू होण्याची शक्‍यता अंधूक होती. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी याबाबत कार्यशाळेतील अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बसची फेरबांधणी (बॉडीबिल्डिंग) केली आणि त्यांच्या इंजिनची दुरुस्ती केली तर या बस पुन्हा मार्गावर धावू शकतील, असे समजले. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करण्यास सुरवात केली. या 400 बसपैकी सुमारे 100 बस ताफ्यातून काढून टाकल्या. सुमारे 200 बसची गेल्या दोन महिन्यांत दुरुस्ती करून त्यांचा वापर सुरू झाला. आता 100 बस बंद आहेत. त्यातील 77 बसच्या फेरबांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी 11 बस मार्गावर धावण्यास सुरवात झाली आहे, असे प्रशासनाने सांगितले. उर्वरित 23 बसच्या इंजिनच्या दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. त्या बसही एक ते दीड महिन्यांत रस्त्यावर येतील, अशी अपेक्षा कार्यशाळेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

याबाबत मुंढे म्हणाले, ''पीएमपीमध्ये बंद पडणाऱ्या बससाठी पुरेसे सुटे भाग वेळेत उपलब्ध होतील आणि बस तातडीने दुरुस्त होतील, यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले होते. दीर्घकाळ बंद पडलेल्या बस लवकर दुरुस्त करण्यावर भर दिला होता. आता फेरबांधणी आणि इंजिनची दुरुस्ती करायची आहे, अशा बसही दोन महिन्यांत दुरुस्त होऊन प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.''

Web Title: marathi news marathi websites Pune News PMPML