वापरलेल्या पुस्तकांच्या विक्रीसाठी 'सेल आउट'; तरुणांनी बनविले 'ऍप'

Representational image of books
Representational image of books

पुणे : पुस्तकं वाचून झाली की एकतर रद्दीत पडतात किंवा दुकानदाराला निम्म्या किमतीत विकली जातात; मात्र अशा पुस्तकांचा पुरेपूर वापर व्हावा याकरिता दोन तरुणांनी मोबाईल ऍप तयार केले आहे... किरण जाधव आणि आशिष बारोकर यांनी 'सेल आउट' नावाचे हे ऍप सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. 

आपण वाचण्यासाठी नवीन पुस्तके घेतो; पण ती एक-दोनदा वाचून झाल्यावर ती कपाटात पडून राहतात. याउलट खूप लोकांना वाचनाची आवड असते; पण किमतीमुळे ते पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत; तसेच अभ्यासक्रमांची पुस्तकेही शैक्षणिक वर्ष संपले की पडून राहतात. त्यांचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी हे ऍप उपयुक्त ठरणार आहे. 

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिने किंवा वर्षाने विविध विषयांची पुस्तके विकत घ्यावी लागतात. पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके घेणे परवडत नाही किंवा जुनी पुस्तके उपलब्ध झाल्यास त्यांना सोईस्कर असते. या ऍपद्वारे जुन्या पुस्तकांचा फोटो टाकून आणि माहिती भरून ती पुस्तके आपल्या परिसरातील लोकांना विकत घेण्यासाठी उपलब्ध करू शकतात.

ज्यांना ही पुस्तके हवी आहेत ते ऍपद्वारे विक्रेत्याशी थेट चॅट करून अथवा फोन करून ती पुस्तके विकत घेऊ शकतात. त्यामुळे कुणालाही कमिशन देण्याची गरज नाही. यामुळे विकणारा आणि विकत घेणारा या दोघांचाही फायदा होणार आहे. 

किरण यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, ते सध्या पुण्यात गुगल क्‍लाउड क्षेत्रात नोकरी करीत आहेत. सुटीत गावी (दुशेरे, ता. कराड) घराची साफसफाई करताना त्यांच्या आई वनिता यांनी, 'जुनी इंजिनिअरिंगची पुस्तके रद्दीमध्ये घालू का?', असे विचारले. तेव्हा किरणला खूप वाईट वाटले. त्याने या पुस्तकांचा योग्य वापर करून ती गरजूंना उपलब्ध करून देण्याचे ठरविले. त्याने नोकरीसोबतच स्मार्टफोन विकसनासंबंधी शिक्षण सुरू केले. ऑफिसच्या वेळानंतर काम करून सहा महिन्यांत त्यांनी SelloutZone हे ऍप विकसित केले. या ऍपमुळे पालकांवरील शिक्षणाच्या खर्चाचा ताण कमी होईल, वाचनाची आवड वाढून शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि देशाच्या प्रगतीला मदत होईल, असे या दोघांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com