पुणे : नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर रिव्हॉल्वर रोखले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे : पतीकडून मारहाण होत असल्याची तक्रार आल्यानंतर घरी गेलेल्या पोलिस बीट मार्शलवर एकाने रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सॅलिटेअर अपार्टमेंटमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

संशयित आरोपी हा सांगली येथील नगरसेविकेचा मुलगा असल्याचे समजते. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर नारायण तोडकर (वय 26, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरेश बाबासाहेब पाटील (वय 36, रा. सॅलिटेअर अपार्टमेंट, मार्केटयार्ड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्‍वर तोडकर हे रविवारी मध्यरात्री मार्शल ड्यूटीवर होते. त्यावेळी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात एका महिलेने तिला पतीकडून मारहाण होत असून, तिला पोलिसांच्या मदतीची गरज असल्याचे फोनवर कळवले. त्यावर पोलिस कर्मचारी तोडकर आणि पोलिस नाईक पोटकुले हे दोघे तातडीने घटनास्थळी पोचले.

पोलिसांनी त्या महिलेकडे विचारपूस केली असता तिने पती-पत्नीमध्ये घरगुती भांडण झाल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी पती मयुरेश पाटील याला विचारले असता त्याने बीट मार्शल तोडकर यांच्यावर रिव्हॉल्वर रोखत "येथून गेला नाही तर ठोकून टाकीन,' अशी धमकी दिली. पाटील याचे मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौक परिसरात वाईन शॉप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: marathi news marathi websites Pune News Pune Crime News