पुणे मेट्रोचे विस्तारीकरण सुरू असलेल्या कामातच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुणे : मेट्रोच्या पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामातच अनुक्रमे निगडी आणि कात्रजपर्यंत विस्तारीकरण होण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत महामेट्रोने प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून पाठपुरावा होत असल्यामुळे आणि खर्चातही बचत होऊ शकते, हे लक्षात घेऊन सुरू असलेल्या कामातच विस्तारीकरण करण्याचा 'महामेट्रो'चा प्रयत्न आहे. 

पुणे : मेट्रोच्या पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामातच अनुक्रमे निगडी आणि कात्रजपर्यंत विस्तारीकरण होण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत महामेट्रोने प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून पाठपुरावा होत असल्यामुळे आणि खर्चातही बचत होऊ शकते, हे लक्षात घेऊन सुरू असलेल्या कामातच विस्तारीकरण करण्याचा 'महामेट्रो'चा प्रयत्न आहे. 

पिंपरीचा मार्ग निगडीपर्यंत तर स्वारगेटचा मार्ग कात्रजपर्यंत वाढविणार आहे. त्यासाठी नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी या दोन्ही मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे पत्र महामेट्रोला दिले होते. या पार्श्‍वभूमीवर कात्रज आणि निगडीच्या विस्तारासाठी पुढील टप्प्यापर्यंत थांबण्याऐवजी सध्या सुरू असलेल्या टप्प्यातच त्याचे काम करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल, असेही महामेट्रोकडून सांगण्यात आले. 

पिंपरी ते रेंजहिल्स आणि वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदाम या दोन मार्गांवर मेट्रोचे काम सुरू झाले आहे. पहिल्या मार्गाच्या डेपोसाठी कृषी महाविद्यालयाची जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळाली असून, दुसऱ्या मार्गासाठी कोथरूडच्या कचरा डेपोची जागा महामेट्रोला हवी आहे. मेट्रोच्या रस्त्यावरील मार्गाचे काम पूर्ण झाले, तरी डेपो उभारल्याशिवाय मेट्रो धावू शकत नाही. त्यामुळे या जागेबाबत महापालिकेने त्वरेने निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे. तसेच त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावाही सुरू केला आहे. 

अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी करार 
मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सोईचा व्हावा, यासाठी वाहतुकीच्या विविध पर्यायांचा एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी सिंगापूरच्या टेमासेक फाउंडेशन इंटरनॅशनल (टीएफआय) आणि सिंगापूर को-ऑपरेशन एंटरप्राईज (एससीई) या संस्थांसह महामेट्रो आणि पुणे महापालिकेचा समन्वयाचा करार बुधवारी झाला. सिंगापूरच्या संस्थांनी पुण्यात तीन दिवसांच्या कार्यशाळेचेही आयोजन केले असून तिला आज सुरवात झाली आहे.

पीएमआरडीए, पीएमपीमधील सुमारे 100 अधिकाऱ्यांना मनुष्यबळ विकास, एकात्मिक वाहतुकीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, 'एससीई'चे प्रमुख कार्यकारी अधिकारी कॉंग वाय मून यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे.

Web Title: marathi news marathi websites Pune News Pune Metro Public Transport