शहरात अपघातांचे सत्र सुरूच; आठ महिन्यांत 242 बळी

Representational Image
Representational Image

पुणे : शहरात गेल्या आठ महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये 242 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे पाचशे जण गंभीर जखमी झाले आहेत. शहर वाहतूक शाखेने वारंवार अपघात होणाऱ्या 36 ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) यादी तयार केली आहे. त्यावर उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे पाठविण्यात आला आहे. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांत अपघातांची संख्या वाढतच आहे. खडी मशिन चौक, उंड्री चौक, येरवडा आणि बाणेर रस्त्यावर गंभीर अपघातात दुचाकीवरील चार महिलांचा नुकताच बळी गेला. वाहनांच्या संख्येत वाढ, अरुंद व खराब रस्ते, ड्रंक अँड ड्राइव्ह, भरधाव वाहन चालविणे, उंच गतिरोधक आणि बेशिस्त वाहनचालक अशा विविध कारणांमुळे अपघात होत आहेत. मात्र, अपघात रोखण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात दररोज अपघातांचे सत्र सुरूच आहे. 

वाहतूक शाखेने गेल्या दोन वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीवरून 'ब्लॅक स्पॉट' निश्‍चित केले आहेत. एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक अपघात झालेल्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. 

अपघातांचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) आणि तेथील अपघातांची संख्या : 
कोथरूड येथील करिष्मा चौक - 5, सहकारनगर येथील वाल्हेकर चौक - 5, कात्रज चौक - 13, दरी पूल - 9, जेधे चौक - 6, डायस प्लॉट - 8, गंगाधाम चौक - 7, फुरसुंगी रेल्वे पुलाजवळ - 13, गाडीतळ परिसर - 7, रामटेकडी चौक - 6, उंड्री चौक - 5, खडी मशिन चौक - 20, विमानतळ भागात तेलाची मोरी - 7, खराडी बायपास - 7, येरवडा येथील हयात हॉटेलसमोर - 9, सादलबाबा चौक - 7, संगमवाडी बस पार्किंग - 5, वारजे येथील मुठा नदी पूल - 11, माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ - 26, डुक्‍करखिंड - 14, वडगाव पूल - 11, नवले पूल - 10, सांगवीतील औंध हॉस्पिटलजवळ - 5, विशालनगर - 5, जगताप डेअरी चौक - 9, बालेवाडी स्टेडिअम - 9, वाकड पूल - 26, बावधन पूल - 21, पुनावळे पूल - 13, भूमकर चौक - 9, धावडे वस्ती - 5, नाशिक फाटा - 6, सीएमई बोपोडी - 5, भक्‍ती शक्‍ती चौक - 7, दिघी मॅगझीन चौक - 5 आणि एआयटी कॉलेज - 6. 

वर्ष 2016 (जानेवारी ते ऑगस्ट) 
एकूण अपघात - 913 
मृत्यू - 278 
गंभीर जखमी - 447 
किरकोळ जखमी - 236 

वर्ष 2017 (जानेवारी ते ऑगस्ट) 
एकूण अपघात - 1039 
मृत्यू - 242 
गंभीर जखमी - 492 
किरकोळ जखमी - 313 

अपघात रोखण्यासाठी महापालिका आणि वाहतूक शाखेकडून संयुक्‍त पाहणी करण्यात येणार आहे. अपघातांची कारणे शोधून प्रमुख चौकांमध्ये पायाभूत सुविधा, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहील. वाहतूक शाखेकडून मद्यपी वाहनचालक, विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणि भरधाव वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मोहीम राबविण्यात येईल. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com