महिलांना 'बडीकॉप'चे सुरक्षा कवच 

महिलांना 'बडीकॉप'चे सुरक्षा कवच 

पुणे : शहरात विविध क्षेत्रांत कार्यरत काही महिलांना कामाच्या ठिकाणी छेडछाड अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते. मात्र, बऱ्याचदा महिला 'जाऊ दे' म्हणत तक्रार करत नाहीत. अशा नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी 'बडीकॉप' संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. 'बडीकॉप' ग्रुपवर तक्रार केल्यास पोलिस त्या महिलेच्या मदतीसाठी धावून येत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत सर्वच पोलिस ठाण्यात 'बडीकॉप' व्हॉट्‌सऍप ग्रुप स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना पोलिसांकडून सुरक्षेचे कवच प्राप्त होणार आहे. 

आयटी कंपनीतील अंतरा दास आणि रसिला राजू या दोन महिला कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. तसेच नोकरदार महिलांच्या छेडछाडीच्या घटना पाहता पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी आयटी हब असलेल्या हिंजवडी, हडपसर, येरवडा आणि विमानतळ या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा उपक्रम सुरू केला. सध्या परिमंडळ तीन आणि चारच्या अंतर्गत 19 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतर लवकरच संपूर्ण शहरात बडीकॉप ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये नोकरदार आणि अन्य महिलांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. 

1. स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथील एका महाविद्यालयात सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके बडीकॉपच्या उपक्रमानिमित्त गेल्या होत्या. त्यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर तीन-चार महिला कर्मचारी आणि काही विद्यार्थिनी त्यांना भेटल्या. महाविद्यालयातील अरुण शिंदे नावाचा प्राध्यापक या महिलांना काही दिवसांपासून अश्‍लील शेरेबाजी करून लज्जास्पद वर्तन करत आहे. मात्र, भीतीपोटी अद्याप तक्रार केली नसल्याचे सांगितले. मात्र, त्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अखेर पोलिसांनी त्या प्राध्यापकाच्या मुसक्‍या आवळल्या. 

2. आयटी कंपनीत उच्चपदस्थ महिलेला एक व्यक्‍ती वेगवेगळ्या मोबाईलवरून सतत फोन आणि मेसेज पाठवून त्रास देत होती. या महिलेने बडीकॉपच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍त समीर शेख यांना हा प्रकार कळविला. त्यांनी महिलेशी संपर्क साधून तक्रार समजावून घेतली. पोलिस निरीक्षक विष्णू पवार, अंजुम बागवान यांच्या पथकाने तो मोबाईल नेमका कोणाचा आहे, हे शोधून संबंधित व्यक्‍तीला समज दिली. त्यानंतर त्या व्यक्‍तीकडून फोन आणि मेसेज येण्याचे थांबले. 

3. मुंढवा येथील पिंगळे वस्तीमधील एक महिला पतीपासून विभक्‍त राहते. तर, पती वडगावशेरी येथे मुलीसह वास्तव्यास आहे. त्या मुलीला भेटण्यासाठी गेल्यानंतर पतीने महिलेला मारहाण करून घरातून बाहेर ढकलून दिले. त्या वेळी त्यांच्या डोक्‍यास मार लागला. या महिलेने हा प्रकार बडीकॉप ग्रुपवर कळविला. त्यावर येरवडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेला मदत केली. हडपसर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

4. वडगावशेरी येथील एक 20 वर्षीय युवती खराडी येथील आयटी कंपनीत कामास आहे. त्यांच्या कंपनीत काम करणारा तिशीतील किशोर रामदास औटी हा कर्मचारी त्या युवतीला 'तू खूप छान दिसतेस. तू मला आवडतेस' असे म्हणत हावभाव करीत असे. युवतीने हा प्रकार बडीकॉपवर पोलिसांना कळविला. त्यावर चंदननगर पोलिसांनी युवतीची छेड काढणाऱ्या औटी याला अटक केली. 

5. खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील एका कंपनीत महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेली. त्या वेळी थिटे वस्तीमधील रजकलम राजबहादूर यादव हा तरुण महिलांच्या स्वच्छतागृहात घुसला. तेथे त्याने या महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने ही बाब पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी तरुणाला अटक केली. 

6. वानवडी येथील रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये रुग्णाच्या वडिलांनी उपचाराबाबत महिला डॉक्‍टरसोबत वाद घालण्यास सुरवात केली. त्यावर या महिला डॉक्‍टरने बडीकॉपवर तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हा वाद सामोपचाराने मिटवला. 

7. कल्याणीनगर येथील एका बॅंकेतील महिलेने स्वच्छतागृहाच्या बाहेरून भिंतीवरून एकजण टक लावून बघत असल्याची तक्रार केली. येरवडा पोलिसांनी बडीकॉप ग्रुपवर आलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मॉडेल कॉलनी येथील सौरभ राजू विटकर याला अटक केली. 

  • 'बडीकॉप' म्हणजे 'पोलिसमित्र' 
  • प्रत्येक पोलिस ठाण्यातील 20 कर्मचाऱ्यांची 'बडीकॉप' म्हणून नेमणूक
  • संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण 
  • 'बडीकॉप'च्या प्रत्येक ग्रुपमध्ये पोलिस चौकीतील अधिकारी, वरिष्ठ निरीक्षकासह अडीचशे महिला 
  • 'बडीकॉप' ग्रुपची जबाबदारी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर 
  • शहरात सध्या 710 'बडीकॉप' ग्रुप स्थापन 
  • 78 हजार 382 महिला ग्रुपच्या सभासद 
  • आयटी कंपनी, बॅंकांसह तीनशे कंपन्यांमध्ये सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन 
  • शंभराहून अधिक महिलांना पोलिसांकडून मदत 
  • ओला, उबेर टॅक्‍सीमध्ये प्रवासी महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक देणार 
  • बडीकॉपच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपचे सदस्य बनण्यासाठी महिलांना स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. 

महिलांची सुरक्षा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 'बडीकॉप'मुळे नोकरदार महिलांसाठी सुरक्षित आणि निर्भय वातावरण निर्माण होईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस 24 तास तत्पर आहेत. त्यामुळे महिलांनी त्यांच्याशी कोणी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास तक्रार देण्यास पुढे यावे. 
- रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्‍त, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com