क्रेनचा दोर तुटल्याने 9 मजुरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या कृष्णा- भीमा- मराठवाडा सिंचन प्रकल्पातील सहावी लिंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा-भीमा बोगद्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू आहे.

भवानीनगर/ वालचंदनगर - उजनी धरणातून 25 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पातील नीरा आणि भीमा नदीला जोडणाऱ्या बोगद्यात लिफ्ट कोसळून सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात नऊ मजूर मृत्युमुखी पडले. इंदापूर तालुक्‍यातील अकोले गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या बोगद्यात तीनशे मजूर काम करीत होते.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दिवसभराचे काम संपवून मजूर नेहमीप्रमाणे लिफ्टने वर येत होते. त्याच वेळी क्रेनचा दोर तुटून लिफ्ट खाली कोसळली. तब्बल दीडशे फूट खाली अत्यंत वेगाने लिफ्ट पडल्याने त्यात बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे नऊ मजूर जागीच ठार झाले. मुकेशकुमार जवाहरलाल मोर्या (वय 26, रा. पो. महावरी, ता. जौनपूर, उत्तर प्रदेश), सुपरवायझर संबिगे समाचंद नायडू (वय 38, रा. गौरीपुरम, विजयनगर, आंध्र प्रदेश), अविनाथ सिद्धा रेड्डी (रा. आंध्र प्रदेश), सुरेंद्र बच्चन यादव (वय 25, रा. उत्तर प्रदेश), छोटू गोले (वय 19, रा. बडगाव), बलराम स्वान, सुशांत पंढी, मुकेश कुमार आणि राहुल सुग्रीव नरुटे अशी मृतांची नावे आहेत.

मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या कृष्णा- भीमा- मराठवाडा सिंचन प्रकल्पातील सहावी लिंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा-भीमा बोगद्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू आहे.

इंदापूर तालुक्‍यातील तावशी येथून नीरा नदीतील पाणी भादलवाडीमार्गे बोगद्यातून "उजनी' जलाशयात सोडण्याची योजना आहे. सोमा-मोहिते कंपनीकडे हे काम असून, कामाची सुरवात अकोले येथून झाली आहे.

अकोले गावाच्या हद्दीत बोगद्यातून दगड-माती बाहेर काढण्याच्या कामासाठी दोन अजस्र विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या बोगद्यात तीनशेहून अधिक प्रशिक्षित कामगार दोन महिन्यांपासून काम करीत आहेत. प्रकल्पाच्या बोगद्यात काम करण्यासाठी दोन विहिरींमधूनच उतरावे लागते. या विहिरींमध्ये उतरण्यासाठी लावलेल्या क्रेन आणि लिफ्टमधून मजूर उतरतात व वर येतात. दुर्घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: marathi news marathi websites Pune News River Linking nira bhima basin