शिक्रापुरातील बोगस डॉक्‍टराला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

शिक्रापूर : जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या जागरूकतेमुळे शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बोगस डॉक्‍टर असल्याचे उघड झाले. यानिमित्ताने जिल्ह्यात बोगस डॉक्‍टर नसल्याचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या कामगारास अटक केली आहे. 

शिक्रापूर : जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या जागरूकतेमुळे शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बोगस डॉक्‍टर असल्याचे उघड झाले. यानिमित्ताने जिल्ह्यात बोगस डॉक्‍टर नसल्याचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या कामगारास अटक केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिक्रापुरात काही युवती रेश्‍माबाई नेमीचंद जैन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या नावाने लहान मुलांची माहिती संकलित करत होत्या. ही माहिती रीना क्‍लिनिकमध्ये देण्यात येत होती. चौकशीच्या निमित्ताने या युवतींनी मंगळवारी (ता. 9) मांढरे यांचे निवासस्थान गाठले. घरातील मुलांची माहिती त्या घेऊ लागल्या. या युवतींबाबत शंका आल्याने मांढरे यांनी याबाबत पती आबाराजे मांढरे यांना माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागकडे तक्रार केली.

तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, आरोग्य सहायक जालिंदर मारणे, आरोग्यसेवक संतोष चोपडा यांनी रीना क्‍लिनिकमधील डॉक्‍टरांची चौकशी केली असता, तिथे कुणी डॉक्‍टरच नसल्याचे उघड झाले. शिक्रापूर पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. पोलिस हवालदार शशिकांत बंड व बाळासाहेब थिकोळे यांनी तपासणी केली असता सदर डॉक्‍टरचे कोणतेही व्यवसाय प्रमाणपत्र आढळून आले नाही. याशिवाय दवाखान्यात विविध प्रकारची औषधे, इंजेक्‍शन्स, गोळ्या, मुदत संपलेली औषधे, वेगवेगळ्या पत्त्यांच्या हॉस्पिटलची कोरी कागदे आढळून आली. विशेष म्हणजे या दवाखान्यात उत्पल बिश्वास हा कामगार रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघडकीस आले. 

दरम्यान, या दवाखान्यात डॉ. पी. कुमार या नावाने एक जण वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य अधिकारी व पोलिसांनी पंचनामा करून सर्व साहित्य ताब्यात घेतले. 

डॉ. शिंदे यांनी या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्पल अरविंद बिश्वास (मूळ रा. दक्षिणपारा, ता. मधुपूर, जि. छाप्राबंगाली - नादिया, पश्‍चिम बंगाल, सध्या रा. शिक्रापूर) याला अटक केली.

Web Title: marathi news marathi websites Pune News Shikrapur