...आता आम्ही करायचे काय? आमचा दोष काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आम्ही सर्व शुल्क भरले आहे; पण आता संस्था आणि शिक्षकांच्या वादात आमचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आले. गेल्या वीस दिवसांपासून महाविद्यालयात तास होत नाहीत. त्यात फेब्रुवारीत आमची ऑनलाइन परीक्षा आहे. आता आम्ही करायचे काय? आमचा दोष काय...?'' 

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आम्ही सर्व शुल्क भरले आहे; पण आता संस्था आणि शिक्षकांच्या वादात आमचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आले. गेल्या वीस दिवसांपासून महाविद्यालयात तास होत नाहीत. त्यात फेब्रुवारीत आमची ऑनलाइन परीक्षा आहे. आता आम्ही करायचे काय? आमचा दोष काय...?'' 

सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीच्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही व्यथा मांडली आहे. या संस्थेत गेल्या महिन्यापासून शिक्षकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ते तासही घेत नाहीत. संस्थेने सात टप्प्यांत वेतन देण्याचा प्रस्ताव शिक्षकांसमोर ठेवला होता; परंतु त्यावर कुणीही विश्‍वास ठेवण्यास तयार नाही.

परिणामी, संस्थेत निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर अद्याप तोडगा निघालेला नाही. 
काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, या वादात शैक्षणिक नुकसान होत असल्याची भीती ते व्यक्त करत आहेत. ''जेवढा काळ हे आंदोलन सुरू राहील, तेवढा काळ विद्यार्थ्यांचेच नुकसान आहे. आंदोलन संपले, की आम्हाला जादा तासांसाठी थांबविले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची घाई केली जाईल. मग आम्हाला अभ्यासासाठी वेळ कधी मिळणार? संस्था आणि शिक्षकांनी किमान विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा,'' अशी भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केली. 

एका विद्यार्थ्याने शिक्षकांच्या मागण्यांचे समर्थन केले. शिक्षकांना पगार मिळाला पाहिजे; पण या वादात विद्यार्थी भरडला जाऊ नये, याची खबरदारी संस्थेने घेतली पाहिजे, असे त्याचे म्हणणे आहे. ''प्रवेश घेताना आम्ही तर पूर्ण शुल्क भरले आहे. मग आमचा काय दोष आहे? या वादातून होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबद्दल कुणाला जबाबदार धरायचे, हा प्रश्‍न आहे. फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षा आहे. त्यात पाच विषयांचे प्रश्‍न विचारले जातील; पण तास मात्र दोन विषयांचे सुरू आहेत. तेदेखील महाविद्यालयातील शिक्षक शिकवत नाहीत. त्यासाठी बाहेरील शिक्षक येत आहेत,'' अशी माहिती त्याने दिली. 

संस्थेकडून मौन 
विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत संस्था वा महाविद्यालयाच्या पातळीवरून अधिकृतपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. संस्थेच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी राजेंद्र पणीकर या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले. त्यांच्याशी दूूरध्वनीवरून संपर्क साधला असता, 'आपण चंडीगड येथे आलो आहे. तेथील परिस्थितीबद्दल फारशी माहिती नाही; पण याबद्दल अधिकृत बाजू माध्यमांना देण्याचा प्रयत्न करू,' एवढेच त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites pune news sinhgad institute education