नोकरी मागणाऱ्यांपेक्षा देणारे व्हा : डॉ. करमळकर

representational image
representational image

पुणे : ''देशातील 130 कोटी लोकसंख्येला उपजीविका देण्याचे काम पारंपरिक शिक्षणपद्धतीतून साध्य झालेले नाही. उच्चशिक्षण घेणाऱ्या लोकांचे प्रमाण आपल्याकडे फक्त 18 टक्के आहे, तर चीनमध्ये ते 47 टक्के आणि अन्य विकसित देशांमध्ये 80 टक्के एवढे आहे. समाजाला आवश्‍यक असलेले शिक्षण देण्याची गरज आहे आणि ती जबाबदारी विद्यापीठांवर आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून असे शिक्षण मिळत आहे. त्यामुळे नवी कौशल्ये आत्मसात करत, नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा,'' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. 

'एमपीटीए एज्युकेशन'तर्फे आयोजित कार्यक्रमात करमळकर यांच्या हस्ते एमपीटीए परिवर्तन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

स्वयम्‌ उपग्रह बनविणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यंग अचिव्हर पुरस्कार, 'शिवनेरी मिसळ'चे संस्थापक सोमनाथ शेलार यांना युवा उद्योजक पुरस्कार, उरळी- कांचन येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविणाऱ्या तरुणांच्या गटाला ग्रीन इनिशिएटिव्ह, 'वर्डसमाया'ला स्टार्टअप ऑफ दि ईयर, माई बालभवन या स्वयंसेवी संस्थेला सामाजिक कार्यासाठी, तसेच जेसीबी कंपनीच्या सीएसआर विभागात काम करणाऱ्या प्राची बोकील आणि कॉस्मा कंपनीच्या एचआर विभागप्रमुख प्रियांका शाक्‍यवंशी यांना इन्स्पायरेबल वूमन ऑफ द ईयर या पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात आले. एमपीटीएचे 'थीम सॉंग' या वेळी सादर करण्यात आले. 
कार्यक्रमाला 'एमपीटीए'चे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे, मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक संदीप पोवार, प्राज इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख रवींद्र उटगीकर, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, कॅपजेमिनी कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे वरिष्ठ संचालक आश्‍विन जयसिंघानी आदी उपस्थित होते. पोवार यांनी लिहिलेल्या 'दि इन्व्हिजिबल एचआर' या पुस्तकाचे प्रकाशनही करमळकर यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. 

डॉ. शिकारपूर म्हणाले, ''आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऍनॅलिटिक्‍स आणि ऍप डेव्हलपमेंट या तीन 'ए'मुळे जग बदलत आहे. मनुष्यबळ विकास म्हणजे एचआर असे म्हणण्याऐवजी आता त्याला टॅलेन्ट मॅनेजमेंट म्हणावे लागणार आहे. भविष्यात एचआर विभागातील लोकांना रोबो हाताळावे लागतील, अशी परिस्थिती येऊ शकते, त्यामुळे प्रत्येकानेच नवनवी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे.'' 

उटगीकर म्हणाले, ''एकूण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या मोठी आहे, ही आपल्यासाठी स्पर्धात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक गोष्ट आहे. पण कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तरुणाईला नवनव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.'' 

सदानंद देशपांडे म्हणाले, ''कौशल्य विकास आणि प्रशिक्षणामुळे कार्यक्षमता वाढते, त्यामुळे देशातील बहुतांश तरुण- तरुणींना कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे.'' प्रसाद कऱ्हाडकर यांनी आभार मानले. दीपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com