'एसटी'ची सेवा पूर्वपदावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत एसटी कामगार संघटनांनी बंद मागे घेतल्यामुळे भाऊबिजेच्या दिवशी प्रवाशांना दिलासा मिळाला. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील तेराही डेपोंतून शनिवारी पहाटेपासून बस सोडण्यास सुरवात झाली. 

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत एसटी कामगार संघटनांनी बंद मागे घेतल्यामुळे भाऊबिजेच्या दिवशी प्रवाशांना दिलासा मिळाला. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील तेराही डेपोंतून शनिवारी पहाटेपासून बस सोडण्यास सुरवात झाली. 

एसटीच्या कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवीत उच्च न्यायालयाने कामगारांना कामावर रुजू होण्याचे आदेश शुक्रवारी दिले. यानंतर कामगार संघटनांनी सर्व कामगारांना कामावर रुजू होण्यास सांगितले. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. प्रादेशिक परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने खासगी बसेसच्या माध्यमातून गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला होता. भाऊबिजेच्या दिवशी एसटीची वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आदी स्थानकांत मोठी गर्दी झाली होती. प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेऊन बसेस सोडल्या जात होत्या. 

कर्मचाऱ्यांचीही गैरसोय 
बाहेरील डेपोच्या बसेस पुण्यात आल्यानंतर संपामुळे त्या येथेच थांबविल्या गेल्या. या बसेस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे चालक आणि वाहकांनाच याबसची जबाबदारी सांभाळावी लागली. या कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्थाही उपलब्ध करून न दिल्याने कर्मचाऱ्यांना स्वत:कडील पैसा चार दिवसांच्या निवास आणि जेवण, चहापाण्यासाठी खर्च करावा लागला, असा दावा कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केला. तर बाहेरील डेपोच्या गाड्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात हलविण्यात आल्या होत्या, असा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. 

चार कोटींचे नुकसान 
एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयांतर्गत सुमारे पाच हजार कर्मचारी असून, ते सर्व शनिवारी कामावर रुजू झाले. दिवाळीत पुणे विभागाला साधारणपणे प्रति दिन एक कोटी रुपये इतके उत्पन्न मिळते. संप चार दिवस चालल्याने चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

सर्व स्थानकांतील बस वाहतूक सुरू झाली आहे. संप सुरू झाला, त्या दिवशी पुण्यात आलेल्या आणि येथेच थांबविल्या गेलेल्या सुमारे साडेतीनशे बसेस पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. सेवा पूर्ववत झाली आहे. 
- श्रीनिवास जोशी, विभागीय नियंत्रक 

आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही हा संप केला होता. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता समिती स्थापन होईल. यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. संप काळात प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. जानेवारी महिन्यांपर्यंत वेतनाची मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा आंदोलन करावे लागेल. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

Web Title: marathi news marathi websites Pune News ST Strike