साखर उद्योगात राजकारण नको : हर्षवर्धन पाटील 

representational image
representational image

पुणे : ''साखर कारखाने हे फक्त काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाहीत, तर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचेही आहेत. त्यामुळे हा उद्योगात पक्षीय राजकारण नको. साखर कारखानदारीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे,'' असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

पाटील म्हणाले, ''ऊस उत्पादक शेतकरी राज्यात सर्वत्र आहेत. तो फक्त राज्याच्या एकाच भागात आहे असे नाही. साखर कारखाने हे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेच नाही. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, शंभूराजे देसाई, राहुल कुल असे किती तरी नेत्यांचेही कारखाने आहेत. कारखाना कोणाचा आहे, यापेक्षा आपण ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे.'' विरोधी पक्षाचा कारखाना असले, तर तो सरकारला कर भरत नाही का किंवा सत्ताधारी पक्षाच्या विचारांचा कारखाना असेल, तर त्याला काही कर माफ आहे का, असा सवालही त्यांनी केला. 

राज्यात 50 हजार कोटी रुपयांची उलाढाल करणारा हा उद्योग आहे. 30 ते 35 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. 50 ते 75 लाख लोक या व्यवसायात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुंतलेली आहेत. राज्य आणि केंद्र सरकारला तीन ते चार हजार कोटी रुपयांचा महसूल या उद्योगातून मिळत आहे. त्यामुळे सहकार्य करण्याच्या दृष्टीने या उद्योगाकडे पाहावे. याकडे कोणताही पक्ष किंवा राजकारण या दृष्टीने बघू नये. या राज्यातील कारखानदारी सरकारने पुढे घेऊन जावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) साखर उद्योगावर झालेला परिणाम सांगताना पाटील म्हणाले, ''यापूर्वी साखर उद्योग केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे होते. एक देश एक करप्रणालीमुळे कारखान्यांना साडेअठरा टक्के 'जीएसटी' लागू झाला आहे. त्यामुळे एका क्विंटलमागे 175 रुपये केंद्र सरकारला भरावे लागतात. त्याचा सेटऑप मिळत नाही. साखरेचे भाव इतके कमी होऊनही व्यापारी साखर घ्यायला तयार नाहीत. असे का होत आहे याचा शोध घेतला पाहिजे.'' 

साखरेच्या कमी झालेल्या दराचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण शेतकऱ्यांना पैसे देणे हे कारखान्यांनाही परवडले पाहिजे. पडते भाव बघितले, तर शेतकऱ्यांना पैसे देणे हे कारखान्यांसाठी जिकिरीचे होणार आहे. 
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com