वेल्हे तालुका तीन दिवसांपासून अंधारात 

वेल्हे तालुका तीन दिवसांपासून अंधारात 

वेल्हे : पाबे (ता. वेल्हे) येथील सबस्टेशनमधील पॉवर ट्रान्सफॉर्मर गुरुवारपासून (ता.14) निकामी झाल्याने वेल्हे तालुक्‍यातील 80 टक्के गावे व भोर तालुक्‍यातील 12 गावे वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात आहेत. 

पाबे येथील सबस्टेशनमधून पानशेत भाग वगळता मार्गासनी-विंझरपासून ते बारागाव मावळ व अठरागाव मावळातील सर्व गावांना वीज देणारी जीवनवाहिनी बंद पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्‍याला वीजपुरवठा करणारे हे एकमेव सबस्टेशन असल्याने 13/11 केव्ही व्होल्टेजची एमव्हीए क्षमता असलेले उच्च दाबाचे रोहित्र अचानक बंद पडले. त्यामुळे तीन दिवसांपासून सरकारी कार्यालयांतील सर्व कामे खोळंबली आहेत.

ऑनलाइनसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वीज नसल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. 

दरम्यान, तालुक्‍यातील महावितरणकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे विभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते व महावितरणची टीम हे तीन दिवसांपासून पाबे सबस्टेशनला ठाण मांडून आहेत. 

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते म्हणाले, का वेल्हे व भोर तालुक्‍यातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या पाबे सबस्टेशनमधील रोहित्रात गुरुवारी बिघाड झाला. वेल्ह्यातील टीमने प्राथमिक तपासणी केली असता, केव्ही आयसोलेटचा पार्ट निकामी झाल्याचे दिसून आले. तो तत्काळ बदलण्यात आला; परंतु वीजपुरवठा पुन्हा दोन तासांनंतर खंडित झाला. पुण्याहून टेस्टिंग टीमला शुक्रवारी पाचारण करावे लागले. त्या टीमकडून तपासणी केली असता, 33/11 केव्ही व्होल्टेजची 5 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र निकामी झाल्याने पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. 14 टन वजनाचे हे रोहित्र चाकणहून मागविण्यात आले. आज शनिवारी (ता.) दुपारी एकच्या सुमारास रोहित्र पाबे येथे पोचले असून चार-पाच तासांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com