शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गस्थ  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गस्थ 

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गस्थ 

पुणे - "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'तर्फे (पीएमआरडीए) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या करारनाम्याच्या मसुद्याला आणि एक हजार तीनशे कोटी रुपयांच्या संभाव्य तफावत निधी (व्हाएबल गॅप फंडिंग) केंद्र सरकारने एकाच वेळी बुधवारी (ता.7) मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पाबाबतची अनिश्‍चितता दूर होऊन तो मार्गी लागण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. 

महामेट्रोतर्फे उभारण्यात येणाऱ्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोकडे सर्वांचे लक्ष लागले होते. "पीएमआरडीए'तर्फे "सार्वजनिक खासगी भागीदारी'तून (पीपीपी) हा मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठीचा संभाव्य तफावत निधी आणि त्यासाठी ज्या कंपनीला काम द्यायचे आहे, त्याच्या करारनाम्याच्या मसुद्याचा प्रस्ताव केंद्राकडे पडून होता. दरम्यानच्या काळात "पीपीपी' तत्त्वावर मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी "पीएमआरडीए'ने मागविलेल्या निविदांना तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, कराराच्या या मसुद्याला केंद्राची मान्यता नसल्याने हे काम थांबले होते. करारनाम्यातील मसुद्याला मान्यता मिळावी, यासाठी "पीएमआरडीए'कडून गेल्या दीड-दोन महिन्यांपासून केंद्राच्या समितीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या समितीने बोट ठेवलेल्या करारनाम्यातील सात त्रुटींबाबतचे स्पष्टीकरण "पीएमआरडीए'ने पाठवले होते. या पार्श्‍वभूमीवर "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते यांनी आज दिल्ली येथे जाऊन केंद्रीय समितीबरोबर चर्चा केली. त्यानंतर केंद्र सरकारने मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली. पुण्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने दोन जानेवारीला मान्यता दिली होती. तत्पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी 16 ऑगस्टला मेट्रोला मान्यता दिली होती. 

असा राहील पुढील प्रवास 
मेट्रोला केंद्र सरकारकडून एक हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात येईल. तसेच मेट्रोसाठी प्राप्त झालेल्या तीन खासगी कंपन्यांच्या निविदा तपासल्या जातील. पुढील दोन महिन्यांत पात्र कंपनीला मेट्रोचे काम दिले जाईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. 

""शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आठ वर्षांनंतर देशात "पीपीपी' तत्त्वावर मेट्रो प्रकल्प करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एक हजार तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत,'' 
- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए 

दृष्टिक्षेपात मेट्रो 
अंतर ः शिवाजीनगर ते हिंजवडी या 23.3 किलोमीटर मार्गावर धावणार 
अपेक्षित खर्च ः 8,313 कोटी रुपये 
मार्ग ः शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, बालेवाडी, वाकड, हिंजवडी 
मेट्रोसाठी पात्र कंपन्या ः टाटा रिएल्टी-सिमेन्स, आयएलएफएस आणि आयआरबी 

मेट्रोचे फायदे 
- "आयटी कंपन्या' पुण्याला जोडल्या जाणार 
- हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार 
- वेळेची बचत 
- प्रदूषण घटणार