नो पार्किंगमध्येच वाहनांतून व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मोशी - रहदारी असलेला पुणे-नाशिक महामार्ग आणि स्पाइन रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रामध्येच बेकायदा व्यावसायिकांची वाहने चोवीस तास पार्किंग केलेली असतात. वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण विभागाचे कार्यालय जवळच आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक केली जाते आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत आहे.

मोशी - रहदारी असलेला पुणे-नाशिक महामार्ग आणि स्पाइन रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रामध्येच बेकायदा व्यावसायिकांची वाहने चोवीस तास पार्किंग केलेली असतात. वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण विभागाचे कार्यालय जवळच आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक केली जाते आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरांतर्गत वाहतुकीसाठी पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या प्रशस्त अशा स्पाइन रस्त्याची निर्मिती केली आहे. दररोज अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या रस्त्यालगत गगनचुंबी इमारती, व्यापारी संकुले तसेच निवासी इमारतीही आहेत. हा रस्ता सुमारे 45 मीटर रुंदीचा असून स्थानिक नागरिक व वाहतुकीसाठी सेवारस्तेही तयार केले आहेत. मात्र, काही काही बेकायदा व्यावसायिकांनी राजा शिवछत्रपती, संत गजानन, स्पाइन सिटी चौकामध्ये रिक्षा, टेंपोमध्ये खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे ही दुकाने नो पार्किंग क्षेत्रामध्येच थाटली आहेत. जवळच चौकात वाहतूक नियंत्रक पोलिस असतात. मात्र, ते या रिक्षांकडे डोळेझाक करतात. हाकेच्या अंतरावरील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कार्यालय आहे. या विभागाचे कर्मचारी याच मार्गाचा वापर करतात. या अतिक्रमणांकडे त्यांचेही दुर्लक्ष होत आहे.

आम्ही तुम्हाला जुमानत नाही जा...
गेल्या आठवड्यातच पालिकेच्या क आणि ई प्रभागाने या पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली होती. त्यानंतर रस्ते आणि चौक सुटसुटीत झाले. त्याबद्दल स्थानिकांनी या विभागाचे अभिनंदनही केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. प्रथम वाहन वजा दुकानांवर कारवाई करा, मग आमच्यावर, अशी त्यांची त्यांची भूमिका होती. पोलिस समोर उभे असताना रिक्षा टेंपो व्यावसायिक आम्ही तुम्हाला जुमानत नाही जा...असे हिणवून पुन्हा व्यवसाय सुरू करतात. स्पाइन सिटी चौकातही कारवाई झाली. पण, पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती झाली.

Web Title: marathi news moshi news no parking vehicle business