नगर रस्ता बीआरटी जूनमध्ये बंद

मंगेश कोळपकर 
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे - नगर रस्त्यावर गाजावाजा करीत सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या बीआरटी मार्गावरील बससेवा आता दोन महिन्यांतच बंद पडणार आहे. कारण तेथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. मात्र, बीआरटी मार्गात काम सुरू होणार असले, तरी नेहमीची बससेवा पूर्ववत राहणार असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. 

पुणे - नगर रस्त्यावर गाजावाजा करीत सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या बीआरटी मार्गावरील बससेवा आता दोन महिन्यांतच बंद पडणार आहे. कारण तेथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. मात्र, बीआरटी मार्गात काम सुरू होणार असले, तरी नेहमीची बससेवा पूर्ववत राहणार असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. 

मेट्रो प्रकल्पांतर्गत वनाज-रामवाडी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यात वनाज ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात शिवाजीनगर-रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. हा मार्ग एलिव्हेटेड आहे म्हणजे रस्त्यावर खांब उभारून त्यावर गर्डर टाकले जातील अन्‌ त्यावरून मेट्रो धावणार आहे. शिवाजीनगर-रामवाडीदरम्यान साडेसात किलोमीटरच्या मेट्रो मार्गासाठी महामेट्रोने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांची मुदत २७ मार्च असून, दुसऱ्या दिवशी त्या उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर कार्यआदेश (वर्कऑर्डर) दिल्यावर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

दोन वर्षांतच बीआरटीला खोडा 
नगर रस्त्यावर येरवडा-वाघोलीदरम्यान बीआरटी मार्गावर २८ एप्रिल २०१६ रोजी बीआरटी सेवा सुरू झाली. या बीआरटीतून पीएमपीच्या सध्या १६ मार्गांवर प्रवाशांना सेवा पुरविली जाते. त्यावर सध्या ९० हून अधिक बसच्या ७०० - ८०० फेऱ्या होतात. मात्र, आता मेट्रोचे काम सुरू झाल्यावर या मार्गावर बीआरटीची बस वाहतूक बंद होणार आहे. या मार्गाचे काम सुमारे दोन वर्षे सुरू राहणार आहे. 

अन्‌ बस खरेदीची घाई 
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीचे चार मार्ग सुमारे ३४ किलोमीटरचे आहेत. या मार्गांवर वाहतुकीसाठी ५५० वातानुकूल (एसी) बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने पीएमपीकडे सादर केला आहे. त्यासाठी दोन्ही महापालिकांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तर, दुसऱ्या बाजूने सुमारे ३०० इलेक्‍ट्रॉनिक बस भाडेतत्त्वावर अथवा खरेदी करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रत्यक्षात चारपैकी एक बीआरटी मार्ग बंद होणार असताना, आता बस खरेदीचीही घाई सुरू झाली आहे.

पीएमपीची वाहतूक सुरू राहणार
नगर रस्त्यावरील बीआरटीची वाहतूक बंद होणार असली, तरी बसची नियमित सेवा सुरूच राहणार आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बीआरटी ज्या मार्गांवर धावते, त्याच मार्गांवर नियमित बससेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रोच्या कामामुळे काहीही परिणाम होणार नाही, असेही पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

बीआरटी मार्गाची रुंदी वाढविणार
नगर रस्त्यावर मध्यभागी मेट्रोचे खांब येणार आहेत. त्यांची रुंदी सुमारे अडीच मीटर असेल. खांब उभारण्यासाठी दोन्ही बाजूला सुरवातीला प्रत्येकी एक मीटर बॅरिकेडिंग करण्यात येईल. त्यानंतर खांब उभारणीचे काम सुरू होईल. मध्यभागातील सुमारे पाच-सहा मीटर रस्ता मेट्रोच्या कामामुळे बंद ठेवावा लागणार आहे. खांब उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर बीआरटी मार्गाची रुंदी दोन्ही बाजूला प्रत्येकी सुमारे एक मीटरने वाढविली जाणार आहे. त्यामुळे बस वाहतूक सुलभ होणार आहे.

Web Title: marathi news nagar brt road close in june