फुलेही मातीमोल!

रवींद्र पाटे
मंगळवार, 13 मार्च 2018

नारायणगाव - उन्हाळी हंगामातील फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, वांगी, कांदा, मेथी, कोथिंबीर या प्रमुख पिकांसह अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कौटुंबिक गरजा भागविणाऱ्या बिजली, झेंडूचे बाजारभाव घसरल्याने ऐन उन्हाळ्यात बळिराजा अडचणीत आला आहे. नीचांकी बाजारभावामुळे तोडणीचा खर्चही वसुली होत नसल्याने उत्पादकांनी कोबी, टोमॅटो, फ्लॉवर व फुलांची तोडणी थांबविली आहे.

कुकडी प्रकल्प अंतर्गतच्या धरणात या वर्षी समाधानकारक पाणीसाठा असल्याने या वर्षी जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. तालुक्‍याच्या मध्यभागातील अल्पभूधारक शेतकरी किराणा मालासह इतर कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी उन्हाळी हंगामात बिजली, झेंडूची लागवड करतात. भाजीपाला पिकांचा तोडणी हंगाम पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, वांगी या प्रमुख पिकांसह कोथिंबीर, मेथी व फुलांच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. 

कोथिंबीर व मेथीच्या जुडीला दोन ते तीन रुपयांदरम्यान, तर बिजली व इतर भाजीपाल्याला प्रतिकिलो एक ते दोन रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. फुले व भाजीपाला मुंबई बाजारपेठेत विक्रीस पाठविण्यासाठी तोडणी मजुरी, पॅकिंग व वाहतूक खर्चासाठी प्रतिकिलो किमान सहा रुपये खर्च येतो. सध्याच्या बाजारभावात हा खर्च वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी तोडणी थांबविली आहे. त्यामुळे मेहनत व भांडवली खर्च फुकट गेल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

कांद्याच्या भावात घट
रविवारी ओतूर व आळेफाटा उपबाजारात अनुक्रमे १२ हजार ८९६, १६ हजार २७९ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार कांद्याला प्रतिकिलो एक रुपये ते दहा रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान कांद्याला प्रतवारीनुसार प्रतिकिलो पंधरा ते ३० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. मार्च महिन्यात भाजीपाला पिकांसह कांद्याच्या बाजारभावात घट झाल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले आहे.

Web Title: marathi news narayangaon news flower