पुण्यात नर्सरीची फी 80 हजार + अडीच लाख डोनेशन!

प्राजक्ता जोशी
गुरुवार, 15 मार्च 2018

महागडं शिक्षण! 
भरमसाठ फी, विविध प्रकारच्या देणग्या यासंदर्भातील विषय दरवर्षी समोर येतात आणि तसेच विरून जातात.. दरवर्षी हजारो पालकांना भेडसावणारी ही समस्या आहे.. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? लिहा तुमचा अनुभव आणि पाठवा आमच्याकडे webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर! 

पुणे : शहरातील कॅम्प भागातील हचिंग्ज स्कूलमध्ये प्री-नर्सरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 80 हजार रुपयांची फी भरल्यानंतरही 'देणगी'च्या नावाखाली तब्बल अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित पालकांनी हा प्रकार 'फेसबुक'वरील एका ग्रुपमध्ये मांडल्यानंतर त्यावर इतर पालकांनीही यासंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत. 

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी 'सकाळ टाईम्स'च्या प्रतिनिधीने त्या पालकांशी संपर्क साधला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.

'सोमवारी (13 मार्च) मला हचिंग्ज शाळेकडून माझ्या मुलाच्या प्रवेशासंदर्भात ई-मेल आला. आम्हाला शाळेत बोलाविण्यात आले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. तिथला सुरक्षा रक्षक आमच्याशी तुसडेपणाने वागला. त्याने आम्हाला शाळेच्या आवारात सोडण्यासही नकार दिला. काही वेळानंतर शाळेच्या कार्यालयात नेण्याऐवजी त्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला अकाऊंट्‌सच्या इमारतीच्या मागे असलेल्या एका खोलीत नेले. तिथे शाळेच्या अकाऊंट्‌स विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आमच्याकडे अडीच लाख रुपये देणगीची मागणी केली. 'शाळा फुटबॉलचे मैदान तयार करणार आहे. त्यासाठी सर्व पालकांना देणगी अनिवार्य करण्यात आली आहे' अशी माहिती त्या महिलेने दिली. त्यावर आम्ही विचारले, की आम्ही ही संपूर्ण रक्कम भरू शकलो नाही, तर काय होईल? यावर त्या महिलेने उत्तर दिले, 'मग प्रवेश घेता येणार नाही!' 

या प्रकाराने त्या पालकांना मोठा धक्का बसला. "लाखो रुपये भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे, हे आधीच समजले असते तर आम्ही या शाळेत आलोही नसतो. या शाळेची प्रतिष्ठा ऐकून आम्ही येथे आलो. पण आता मला माझ्या मुलाला या शाळेत घालण्याची इच्छा नाही. आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने यापूर्वीच आम्हाला अशा प्रकाराची कल्पना दिली होती; पण सुरवातीला आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते', अशी प्रतिक्रिया या पालकांनी व्यक्त केली. 

"देणगी अनिवार्य नाही'' 
या प्रकरणी 'हचिंग्ज स्कूल'च्या मुख्याध्यापकांशीही संपर्क साधला. 'गेल्या वर्षीही अशाच प्रकारची घटना घडली होती. ही देणगी सर्वांना अनिवार्य नाही. माझ्या माहितीप्रमाणे, पालक त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊ शकतात', असा दावा मुख्याध्यापिका रिटा काटवती यांनी केला. 

यापूर्वीही मागितली होती अशीच देणगी! 
पाच वर्षांपूर्वी एका पालकाने याच शाळेविषयीचा अनुभव 'फेसबुक'वरच मांडला होता. 'मला माझ्या मुलाच्या प्रवेशासंदर्भात शाळेकडून बोलाविणे आले. त्यावेळी शाळेच्या फीमध्ये समावेश नसलेली रक्कमही भरण्यास सांगण्यात आले होते. मी त्यांना यामागील कारण विचारले, तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि कोणतीही स्पष्ट माहिती देण्याचे टाळण्यात आले. मी या शाळेतील प्रवेश रद्द केला', असे त्यांनी लिहिले आहे.

महागडं शिक्षण! 
भरमसाठ फी, विविध प्रकारच्या देणग्या यासंदर्भातील विषय दरवर्षी समोर येतात आणि तसेच विरून जातात.. दरवर्षी हजारो पालकांना भेडसावणारी ही समस्या आहे.. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? लिहा तुमचा अनुभव आणि पाठवा आमच्याकडे webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर! 

Web Title: marathi news nursery education in Pune hutchings school pune