साने, गव्हाणे की काटे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पिंपरी - महापालिका सभागृहाचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजीनामा घेतला असून, त्यांच्या जागी नवा नेता निवडीची तयारी सुरू केली असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतल्यानंतर पवार यांनी बहल यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार बहल यांनी पक्षाकडे राजीनामा पाठविला असून, 22 मार्च रोजी नवा नेता निवडला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पिंपरी - महापालिका सभागृहाचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजीनामा घेतला असून, त्यांच्या जागी नवा नेता निवडीची तयारी सुरू केली असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतल्यानंतर पवार यांनी बहल यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार बहल यांनी पक्षाकडे राजीनामा पाठविला असून, 22 मार्च रोजी नवा नेता निवडला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

महापालिकेतील वर्षभराचा विरोधी पक्षाच्या कामाचा आढावा पवार यांनी बैठकीद्वारे घेतला होता. बहल विरोधी पक्षनेता म्हणून प्रभाव पाडू शकले नाहीत. शिवाय, त्यांच्या कार्यपद्धतीवरही अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेच्या कारभारावर नजर ठेवून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याच्या अनेक संधी सोडण्यात आल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. या उलट पक्षाने पालिकेच्या बाहेर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलने करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या कामगिरीबद्दल पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत बहल यांना जाब विचारून राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बहल यांनी पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. मात्र, पक्षाकडून गुप्तता पाळण्यात आली होती. 

विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कालावधी संपल्याने बहल यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात अंतर्गत नाराजीमुळेच बहल यांनी राजीनामा दिल्याचे कळते. आता 22 रोजी नव्या नेत्याची निवड जाहीर केली जाणार आहे, त्यासाठी सभागृहातील अनुभवी व ज्येष्ठ नेत्याची निवड अपेक्षित आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व अनुभवी नगरसेवक अजित गव्हाणे, चिखलीचे धडाडीचे नगरसेवक दत्ताकाका साने, पिंपळे सौदागरचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे आणि माजी महापौर व भोसरीच्या नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याशिवाय आणखीही नाही नावे चर्चेत आहेत. 

अनुभवी नावालाच पसंती 
गव्हाणे हे माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक असून, आतापर्यंत चार वेळा ते निवडून आले आहेत. एकदा भाजप, एकदा अपक्ष आणि दोन वेळा राष्ट्रवादीकडून ते निवडून आले. शिवाय, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. दत्ता साने हे राष्ट्रवादीचे धडाकेबाज आणि तितकेच अभ्यासू नगरसेवक म्हणूनही परिचित आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर बहल यांची विरोधी पक्षनेतेपदी झालेल्या निवडीला त्यांनी कडाडून विरोध केला. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत. डॉ. वैशाली घोडेकर या माजी महापौर असून, महिला नगरसेवक म्हणून त्या विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत आहेत. नाना काटे हे भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कट्टर व अनुभवी नगरसेवक आहेत. जगताप यांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका पाहता अजित पवार कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news pcmc Opposition Leaders NCP yogesh behl