तिजोरीच्या चाव्या गायकवाडांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

मला भाषण करायला आवडणार नाही. पण, मी काम करून दाखवीन. पाणीपुरवठा व अन्य विकास कामांना प्राधान्य देणार आहे. मी स्वतः कारभार करणार आहे. पुढील वर्षभरात जुने प्रकल्प पूर्ण करू. नवीन प्रकल्प मार्गी लावू.
- ममता गायकवाड, नवनिर्वाचित अध्यक्षा, स्थायी समिती

पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या ममता गायकवाड यांची बुधवारी निवड झाली. त्यांना ११ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्‍वर भोंडवे यांना चार मते मिळाली. शिवसेनेचे अमित गावडे मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले.

भाजपचे पेल्यातील वादळ
ममता गायकवाड यांना पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून कालपर्यंत भाजपतील गटबाजीबाबत चर्चा सुरू होती. ती पेल्यातील वादळ ठरली. उमेदवारी न मिळाल्याने राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. तेही ‘स्थायी’च्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी गायकवाड यांना मतदान केले. भाजपच्या दहा आणि त्यांना पाठिंबा दिलेले एक अपक्ष नगरसेवक यांनी पक्षाचा आदेश मान्य करून गायकवाड यांना मतदान केले.

शुभेच्छांचा वर्षाव
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड येथून गायकवाड प्रथमच महापालिकेत निवडून आल्या आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या त्या समर्थक आहेत. निवडीनंतर महापौर नितीन काळजे, आमदार जगताप, सभागृह नेते पवार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी गायकवाड यांना पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेना तटस्थ
राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक स्थायी समितीत आहेत. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन पक्षाचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांनी मतदान केले. मात्र, निकालाचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली.

अशी झाली निवडणूक
पुण्यातील महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर निवडणुकीसाठी पीठासीन प्राधिकारी होते. त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दुपारी बारा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू केली. उमेदवारी अर्जाची छाननी केली. उमेदवारी मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. त्यानंतर प्रत्येक सदस्यांना त्यांचे स्वतःचे आणि उमेदवाराचे नाव सांगून हात वर करून मतदान करण्यास सांगितले. या सर्व प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात आले. गायकवाड यांना एकच्या सुमाराला विजयी घोषित केले.

मला भाषण करायला आवडणार नाही. पण, मी काम करून दाखवीन. पाणीपुरवठा व अन्य विकास कामांना प्राधान्य देणार आहे. मी स्वतः कारभार करणार आहे. पुढील वर्षभरात जुने प्रकल्प पूर्ण करू. नवीन प्रकल्प मार्गी लावू.
- ममता गायकवाड, नवनिर्वाचित अध्यक्षा, स्थायी समिती

ममता गायकवाड यांचा परिचय
स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड या २०१७ मध्ये प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्या २६ वर्षांच्या असून, दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे मूळ गाव सातारा आहे. त्यांचे पती विनायक गायकवाड २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

कोण काय म्हणाले...
आमदार लक्ष्मण जगताप : 
गायकवाड यांच्या निवडीबाबत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमदारांना विचारून एकमताने ममता गायकवाड यांना स्थायी समिती अध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मागासवर्गीय समाजाच्या नगरसेविकेला पक्षाने पुन्हा संधी दिली. राज्यात प्रथमच असा निर्णय झाला. 

काहींच्या राजीनाम्याबाबत : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. उमेदवारी न मिळाल्याने नाराज होणे सहाजिक आहे. त्यांची नाराजी दूर केली जाईल. भाजपमध्ये कोणतेही गटतट नाहीत.

आमदारांच्या खेळी केल्याच्या आरोपाबाबत : उमेदवारी मिळाल्याच्या दिवशी सकाळपर्यंत गायकवाड यांना त्याबाबत माहिती नव्हती. पक्षाच्या नेत्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे.

महापौर नितीन काळजे यांच्या पदाच्या राजीनाम्याबाबत : पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भात निर्णय घेतील. तो महापौरांना मान्य असेल.

सभागृह नेते एकनाथ पवार :
पक्षामध्ये कोणतीही गटबाजी नसून, भाजपच्या सर्व ११ नगरसेवकांनी गायकवाड यांना मते दिली. विरोधकांची मतेही आम्ही मिळवू शकलो असतो; परंतु फुले-आंबेडकरांच्या विचारांनुसार आम्ही काम करीत आहोत. भाजपच्या नेत्यांनी सामाजिक समरसता दाखवीत मागासवर्गीय नगरसेविकेच्या मागे ताकद उभी केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी मागासवर्गीय नगरसेविकेला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले.

उपमहापौर शैलजा मोरे :
कामांची गुणवत्ता राखत त्यांची संख्या वाढविण्यावर व शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर आगामी काळात भर दिला जाईल.

पिंपरीचा विचार नाही : विनायक गायकवाड
ममता गायकवाड यांचे पती विनायक गायकवाड यांना पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहात का, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, ते म्हणाले, ‘‘माझ्या डोक्‍यातही तो विचार नाही. विधानसभा निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही. मी पक्षाकडे त्यासंदर्भात विचारणाही करणार नाही.’’

महापौर नितीन काळजे :
भाजपमध्ये आम्ही सर्व जण एक आहोत. आमच्यात कोणतीही गटबाजी नाही.

Web Title: marathi news PCMC pimpri mamata gaikwad pimpri