कॅशव्हॅन लुटणारे चौघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पिंपरी - ऍक्‍सिस बॅंकेची कॅशव्हॅन पळवून नेणाऱ्या चालकासह चौघांना वाकड पोलिसांनी शनिवारी (ता. 3) रात्री औरंगाबाद आणि बीडमधून अटक केली. त्यांच्याकडून 71 लाखांची रोकड जप्त केली. अवघ्या 72 तासांत गुन्ह्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

पिंपरी - ऍक्‍सिस बॅंकेची कॅशव्हॅन पळवून नेणाऱ्या चालकासह चौघांना वाकड पोलिसांनी शनिवारी (ता. 3) रात्री औरंगाबाद आणि बीडमधून अटक केली. त्यांच्याकडून 71 लाखांची रोकड जप्त केली. अवघ्या 72 तासांत गुन्ह्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

त्रिंबक गणपती नहिराळे (वय 37, रा. मु.पो. मांडवजाळी, ता. जि. बीड), अमोल लक्ष्मण धुते (वय 27), रणजित धर्मराज कोरेकर (वय 42), (दोघेही, रा. साईपार्क, माऊलीनगर, दिघी) आणि विठ्ठल रामहरी जाधव (वय 34, रा. लोळदगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ऍक्‍सिस बॅंकेच्या कॅशव्हॅनवरील चालक रणजित कोरेकर याने 74 लाख 50 हजार रुपये असलेली कॅशव्हॅन चोरून नेली. त्याच दिवशी ही कॅशव्हॅन भोसरीत सापडली. मात्र, त्यातील पैशाची पेटी मिळाली नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी रिकामी पेटी शिक्रापूरजवळ सापडली.

विठ्ठल जाधव हा मास्टरमाइंड
सर्व आरोपी हे बीड जिल्ह्यातील असून, ते दिघी परिसरात राहण्यास आहेत. चौघेही वाहनचालक म्हणून काम करतात. कॅशव्हॅनचा चालक रणजित कोरेकर याला मद्याचे व्यसन असल्याचे गुन्ह्याचा मास्टरमाइंड विठ्ठल जाधव याने हेरले. त्याने कॅशव्हॅन लुटीची योजना आखली. 31 जानेवारीला आरोपी त्रिंबक याच्या ओला कॅबमधून (एमएच-48-एफ-1984) सकाळपासूनच कॅशव्हॅनचा पाठलाग करत होता. संधी मिळताच कॅशव्हॅन चालकाने व्हॅन लुटून नेली.

...म्हणून आरोपी सहीसलामत पळाले
आरोपी कोरेकर याने तब्बेत ठीक नसल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तो कॅशव्हॅन घेऊन पळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हॅन मिळाली नाही. दीड तासानंतर त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळविले. नाकाबंदीत पकडले जाऊ नये म्हणून आरोपींनी कॅशव्हॅन भोसरीला सोडून पुढील प्रवास आरोपी त्रिंबक याच्या ओला कॅबने शिक्रापूरच्या दिशेने केला.

देवदर्शनाची परंपरा कायम
शहरात घडलेल्या अनेक मोठ्या गुन्ह्यांनंतर आरोपी देवदर्शनाला गेल्याचे वेळोवेळी तपासात निष्पन्न झाले. कॅशव्हॅन लुटल्यानंतर आरोपी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर मद्य, कपडे आणि मोबाईलवर त्यांनी रक्‍कम उधळली.

अवघ्या तीस हजारांत गंडवले
आरोपी रणजित याला मद्याचे व्यसन होते. कॅशव्हॅन लुटल्यानंतर इतर आरोपींनी त्याला मद्य पाजले. तसेच अवघे तीस हजार रुपये त्याला दिले. आपण उद्या भेटू, असे सांगून त्याला औरंगाबादमध्ये सोडून दिले. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर तो आपल्या साथीदारांना शोधत होता.

बॅंकेचाही निष्काळजीपणा
रणजित हा कॅशव्हॅनवर बदली चालक म्हणून काम करीत होता. मात्र, एवढी मोठी जबाबदारी देताना त्याला कोणते व्यसन आहे का, याची खातरजमा बॅंकेने केली नाही. तसेच ओला कॅबनेही चालकाची पार्श्‍वभूमी पाहिली नाही. यामुळे या दोन्ही कंपन्यांना समज दिली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी सांगितले.

आरोपींची पार्श्‍वभूमी
विठ्ठल जाधव याच्यावर दरोडा, गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत, तर अमोल धुते याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल आहे, तर त्रिंबक नहिराळे याच्यावर गंभीर मारहाण, अपघात आणि जुगाराचा गुन्हा दाखल आहे.

कारवाई करणारे पथक
परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे, सहायक आयुक्‍त विक्रम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय लोंढे, उपनिरीक्षक हरीश माने व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी ही कामगिरी केली. गुन्हे शाखेचीही या तपासामध्ये मोलाची मदत झाल्याचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी - ऍक्‍सिस बॅंकेची कॅशव्हॅन लुटणाऱ्यांना अटक केल्यानंतर घटनेची माहिती देताना पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी.

Web Title: marathi news pimpri news 4 arrested in cashvan theft