एम्पायर इस्टेट पूल एप्रिलअखेर पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

पिंपरी - एम्पायर इस्टेटसमोरील पूल आणि त्याला जोडणारा काळेवाडी फाट्यापासूनचा रस्ता एप्रिलअखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शहरातील सर्वांत लांब असणाऱ्या (1.6 किलोमीटर) या पुलावरून एप्रिलअखेरीला वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या मार्गावरून बीआरटी बससेवाही ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. 

पिंपरी - एम्पायर इस्टेटसमोरील पूल आणि त्याला जोडणारा काळेवाडी फाट्यापासूनचा रस्ता एप्रिलअखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शहरातील सर्वांत लांब असणाऱ्या (1.6 किलोमीटर) या पुलावरून एप्रिलअखेरीला वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या मार्गावरून बीआरटी बससेवाही ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. 

या प्रकल्पाचे काम मोठे असल्याने त्याचे पाच भागांत विभाजन करण्यात आले. पुलाचे काम झाले असून, त्यावरील शेवटच्या टप्प्यातील रंगकाम सुरू झाले आहे. पुलापासूनच्या रस्त्याचा भराव टाकण्यात येत आहे. त्याचे डांबरीकरण महिनाभरात पूर्ण होईल. ही कामे झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी मंगळवारी सांगितले. 

एम्पायर इस्टेट येथे पुलाच्या रॅम्पचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या पुलावरून बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग तयार केला आहे. या रस्त्याची रुंदी 45 मीटर आहे. त्यावर बीआरटीसाठी 17 थांबे आहेत. त्यापैकी आठ थांबे तयार झाले आहेत. पाच थांब्यांची कामे सुरू झाली आहेत. निगडी-दापोडी मार्गावरील रस्ता दुभाजकावर खांब उभारण्यासाठी पाया घेण्यास सुरवात झाली. त्या खांबांवर पुलावरील बीआरटीसाठी थांबा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तेथे बीआरटीने येणाऱ्या प्रवाशांना दापोडी-निगडी मार्गावरील बीआरटीसाठीही जाता येईल. या रस्त्याची रुंदी जाधववाडी येथे 30 मीटर, तर कुदळवाडी येथे 24 मीटर असेल. या दीड किलोमीटर अंतरात बीआरटी मार्गातून अन्य वाहनांनाही ये-जा करता येईल. त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बीआरटी थांबे असतील. ते तीन थांबे लवकरच उभारण्यात येतील. 

असा असेल पूल 
काळेवाडी फाट्यापासून सुरू होणारा हा नवीन रस्ता एम्पायर इस्टेटसमोरील पुलावरून ऑटो क्‍लस्टरपर्यंत जाईल. या पुलावरून वाहनचालकांना पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्वेकडून पश्‍चिमेकडे ये-जा करणे सोईस्कर ठरणार आहे. हा रस्ता पुढे केएसबी चौक, देहू-आळंदी रस्त्यावरील चिखली गावापर्यंत जाईल. या रस्त्याची लांबी सव्वादहा किलोमीटर आहे. बीआरटीला स्वतंत्र मार्ग करण्यात येत असल्यामुळे सार्वजनिक बसवाहतूकही वेगवान होईल. 

रस्ता आणि पूल 
प्रकल्प खर्च - 213 कोटी रुपये 
रस्त्याची लांबी - 10.25 किलोमीटर 
रस्त्याची रुंदी - 45 मीटर 
पुलाची लांबी - 1.6 किलोमीटर 
पुलाची रुंदी - 31.2 मीटर 

Web Title: marathi news pimpri news Empire Estate bridge BRT