पीएफ न भरणाऱ्यांवर अटकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरणाऱ्यांना अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. तरीही रक्‍कम थकीत ठेवणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून रक्‍कम वसूल केली जाईल. लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.
- अमिताभ प्रकाश, आयुक्‍त, विभागीय भविष्यनिर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डी

पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने थकीत पीएफची रक्‍कम वसूल करण्यासाठी एक मार्चपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पीएफचा भरणा न करणाऱ्या शहरातील पाच ते सहा आस्थापना मालकांवर अटकेची कारवाई होणार आहे. 

अनेक उद्योगांची आर्थिक स्थिती चांगली नसते. बऱ्याचदा कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्‍कम कपात केली जाते. मात्र, भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे भरणा केला जात नाही. त्यामुळे पीएफचा भरणा न करणाऱ्या आस्थापनांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येत असल्याचे विभागीय भविष्यनिर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

दृष्टिक्षेपात पीएफ
 २०१७-१८ मध्ये शहरातील ७४३ आस्थापनांकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्‍कम थकीत
 पीएफची थकीत रक्‍कम १० कोटी ३७ लाख रुपये
 पीएफचे २ कोटी २५ लाख रुपये वसूल
 यंत्र, जमीन, इमारती अशी सहा कोटींची मालमत्ता जप्त 
 उर्वरित २ कोटी १२ लाखांची मालमत्ता जप्तीच्या हालचाली सुरू
 पीएफ थकीत ठेवणाऱ्या आस्थापना पिंपरी, चिंचवड, हिंजवडी, मावळ, खेड, तळेगाव, लोणावळा भागातील
 कर्मचाऱ्यांची संख्या २०० ते ४००
 दोन महिने ते एक वर्षापर्यंत पीएफ न भरणाऱ्या १५० जणांकडून एक कोटी वसूल
 दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांकडे पीएफची थकीत रक्‍कम तीन कोटी असून दावे कोर्टात सुरू आहेत 

कायदा काय सांगतो ? 
 कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्‍कम न भरणाऱ्या आस्थापनांवर भविष्यनिर्वाह निधी १९५२ कायद्यातील कलम आठ बी ते आठ जी अन्वये कारवाईची तरतूद
 संबंधित मालकाला अटक करणे
 बॅंक खाते गोठवणे
 आस्थापना आणि मालकांच्या स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव करणे

Web Title: marathi news pimpri news pf crime