फुले रुग्णालयातील समस्यांमुळे रुग्ण त्रस्त

दीपेश सुराणा
बुधवार, 14 मार्च 2018

पिंपरी - चिंचवडगाव येथील महापालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात सध्या विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. डॉक्‍टरांची संख्या अपुरी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कार्यान्वित नाही. बालरोग विभाग, बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) या सुविधा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.

पिंपरी - चिंचवडगाव येथील महापालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात सध्या विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. डॉक्‍टरांची संख्या अपुरी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कार्यान्वित नाही. बालरोग विभाग, बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) या सुविधा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.

दृष्टिक्षेपात रुग्णालय -
रुग्णालयाची क्षमता : ४८ खाटा
बाह्यरुग्ण विभागात दररोज तपासले जाणारे रुग्ण : सरासरी ५००
सुविधा : तातडीक सेवा विभाग, त्वचा व गुप्तरोगावरील उपचार, बाह्यरुग्ण विभाग, क्षयरोग निवारण केंद्र, महिलांसाठी प्रसूतीची सुविधा, एचआयव्ही विभाग, प्रयोगशाळा, स्त्रीरोग आणि मेडिसिन विभाग, पल्स पोलिओ व अन्य राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्याची सोय.

प्रमुख समस्या -
 डोळे, कान, नाक, घसा, बालरोगतज्ज्ञ, तसेच हाडांचे डॉक्‍टर नसल्याने गैरसोय
 दोन मजल्यावरील कूलरमध्ये पिण्याचे पाणीच नाही
 सिटी स्कॅनसाठी रुग्णांना पाठवावे लागते वायसीएमध्ये
 फिजिशियन डॉक्‍टरांचे प्रमाण कमी असल्याने बाह्यरुग्ण विभागावर ताण
 स्वतंत्र विभाग नसल्याने बालकांवरील उपचाराला मर्यादा
 अतिदक्षता विभाग कार्यान्वित नसल्याने रुग्णांची परवड
 नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागच (एनआयसीयू) नाही
 प्रसूती व कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रियांसाठी कक्षांचा अभाव
 शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक सर्जनची कमतरता

उपाययोजना -
 विविध उपचारांसाठी अनुभवी व तज्ज्ञ डॉक्‍टरांचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक
 रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करणे आवश्‍यक
 बालकांसाठी स्वतंत्र विभाग, तर नवजात बालकांसाठी हवे एनआयसीयू
 विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष उभारण्याची गरज
 रुग्णालयातील सर्व मजल्यांवर उपलब्ध व्हावे पिण्याचे पाणी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात सोनोग्राफी करण्याची सुविधा असायला हवी. रुग्णांना सोनोग्राफी काढण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविले जाते किंवा खासगी रुग्णालयातून ही सोनोग्राफी काढून घ्यावी लागते. बालकांसाठी उपचाराची सुविधा असायला हवी.  
- गणेश जगताप, चिंचवड

रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी चांगल्या सुविधा असायला हव्यात. त्यांना तातडीने उपचार मिळायला हवे. डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने त्यांची गैरसोय होते. तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्‍टर वाढविले पाहिजे.
- भरत पाटील, चिंचवडेनगर

तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नव्याने उभारणार आहे. संबंधित रुग्णालयातील सर्व विभाग क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात जागेअभावी हलविणे शक्‍य झालेले नाही. पर्यायाने कान, नाक, घसा, तसेच अतिदक्षता विभाग सुरू करता आलेला नाही. तालेरा रुग्णालयाची नव्याने उभारणी झाल्यानंतर या सर्व सुविधा देणे शक्‍य होईल. 
- डॉ. वीणादेवी गंभीर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी. 

Web Title: marathi news pimpri news phule hospital issues patient