‘यश’च्या संसारात प्रेमाची ‘सुरूची’

आशा साळवी
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

विवाह म्हणजे केवळ जोडीदार निवडणे नसते. आपल्या जीवनात एक पूर्ण नवे पर्व घेऊन येणारी ही घटना असते. सध्या वैवाहिक जीवनातील ताणतणाव आणि विसंवाद पाहता मी खूप लकी आहे, असे वाटते. 
- सुरूची त्रिवेदी 

पिंपरी - विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे म्हटले जाते. तरीही भावी जोडीदाराविषयी अनेक तरुण-तरुणी स्वप्न रंगविणे सोडत नाहीत. असेच स्वप्न अलाहाबाद येथील सुरूचीने रंगविले होते. तिच्या समोर पिंपरी- अजमेरा कॉलनीतील यश अर्थात टोनीचा प्रस्ताव गेला. त्याचे छायाचित्र पाहताच सुरूची त्याच्या प्रेमात पडली. तो गतिमंद असल्याचे कळल्यानंतरही ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. विवाह झाला. या घटनेला आज सात वर्षे उलटली. यश व सुरूची यांचा संसार फुलला. प्रेमाचे प्रतीक ठरला. त्यांच्या संसारवेलीवर कन्येच्या रूपाने कळी उमलली आहे. माझ्यासाठी जिवाचं रान करणारा ‘यश’च खरा ‘व्हॅलेंटाइन’ असल्याची भावना सुरूची आवर्जून बोलून दाखविते. 

प्रकाशचंद त्रिवेदी यांच्या घरी १९८३ मध्ये टोनीचा जन्म झाला. मुलाच्या जन्माने संपूर्ण कुटुंबात आनंद पसरला. गोरापान, सुस्वरूप असलेला टोनी पाच वर्षांनंतरही बोलेना. त्रिवेदी कुटुंबीय काहीसे काळजीत पडले. टोनीच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली. तरीही उपयोग झाला नाही. ‘स्पीच थेरपी’नंतरही समस्या कायम राहिली. त्यामुळे त्रिवेदी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. टोनीचा बुद्‌ध्यांक कमी असल्याचे वैद्यकीय निदान झाले; मात्र तो मतिमंद नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मेंदूची वाढ अपुरी राहिल्याने त्याच्यावर ‘स्लो लर्नर’चा शिक्का बसला. अजमेरात त्याचे बालवाडीपर्यंत शिक्षण झाले.

त्यानंतर त्याला आकुर्डीतील कामायनी स्कूलमधून उर्वरित शिक्षण (वयाची १८ वर्षे) पूर्ण करावे लागले. त्याच्या विवाहाचा प्रस्ताव सुरूचीकडे गेला. बारावी शिकलेल्या सुरूचीने टोनीचे छायाचित्र बघितले आणि त्याच्या प्रेमात पडली. प्रत्यक्ष बोलणी सुरू झाल्यावर सुरूचीच्या मनातील ‘ड्रीम बॉय’चे स्वप्न विखुरले. सर्वसामान्य व्यक्तीचा संसार कोणीही करेल. आपण, टोनीच्या आयुष्यात नवा प्रकाश आणू, असा विचार करून तिने विवाहाला होकार दिला. धुमधडाक्‍यात विवाह पार पडला. त्यानंतर टोनीने तिला कोणतीही उणीव भासू दिली नाही. किंबहुना, सुरूचीनेही टोनीच्या आयुष्यातील मोकळा कप्पा भरून काढला. त्यांच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देणारे कन्यारत्न त्यांना प्राप्त झाले. 

सुरूचीचा मोकळा संवाद आणि निखळ हास्य तिच्या सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनाची साक्ष देते. अन्य जोडप्यांना पाहून अनेकदा त्यांचा हेवाही वाटतो; पण त्यांच्या आयुष्यातील अडचणी पाहिल्यावर माझ्या आयुष्याबद्दल मला समाधान वाटते, असे ती सांगते. 

Web Title: marathi news pimpri news pune news valentine day love marriage