मे महिन्यात शहरामध्ये दिवसाआड पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पिंपरी - नागरिकांची उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची मागणी वाढणार असल्यामुळे मे महिन्यात शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सध्या 54 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे रोज जेवढे पाणी शहराला दिले जाते, तेवढे पाणी जुलैअखेरपर्यंत देण्याची जलसंपदा विभागाची तयारी आहे.

पिंपरी - नागरिकांची उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची मागणी वाढणार असल्यामुळे मे महिन्यात शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सध्या 54 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे रोज जेवढे पाणी शहराला दिले जाते, तेवढे पाणी जुलैअखेरपर्यंत देण्याची जलसंपदा विभागाची तयारी आहे.

शहराच्या अनेक भागांत विस्कळित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. जलसंपदा विभागातर्फे गेले काही दिवस कमी पाणी दिल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 13) केला. तर महापालिकेच्या मागणीनुसार गेले दोन दिवस नेहमीपेक्षा जास्त पाणी नदीत सोडल्याचा खुलासा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.

महापालिका पवना नदीवरील रावेत बंधारा येथून निगडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उचलते. तेथे रोज 480 ते 485 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेते. ते पाणी गेल्या आठवड्यात 15 ते 20 एमएलडीने कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांत मात्र पाण्याचे प्रमाण 490 एमएलडीपेक्षा जास्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर म्हणाले, 'धरणात सध्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे. एप्रिलमध्ये आम्ही सध्याप्रमाणे पाणी देऊ. मे महिन्यात आम्ही दिवसाआड पण पुरेसे पाणी पुरविणार आहोत. कारण पुढे धरणातील पाणीसाठा स्थिती कमी झाल्यास प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.''

जलसंपदा विभाग पाणी देण्यास तयार असताना महापालिका स्वतःहून पाणीकपात का करीत आहे, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'धरणातील साठा जुलैमध्ये कमी झाल्यास शहरापुढे प्रश्‍न निर्माण होईल, म्हणून एप्रिल अखेरीला धरणातील पाणीसाठा स्थिती लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ.''

यासंदर्भात जलसंपदा विभागाचे पवना धरणाचे उपअभियंता नानासाहेब मठकरी म्हणाले, 'महापालिकेच्या मागणीनुसार दोन दिवसांत धरणातून साडेसहा तासांऐवजी आठ तास पाणी सोडण्यास सुरवात केली. सध्या महापालिका 480 ते 485 एमएलडी पाणी घेते. ते प्रमाण त्यांनी आता पाचशे एमएलडीच्या वर वाढविले आहे. तसे झाल्यास शेवटच्या टप्प्यात पाणीपुरवठ्यावर ताण येऊ शकतो. नेहमीप्रमाणे पाणी पुरविण्याची जलसंपदा विभागाची तयारी आहे. मे आणि जून महिन्यांतही पवना धरणातून 480 एमएलडी पाणी देता येईल.''

Web Title: marathi news pimpri news water supply