‘वाय जंक्‍शन’ एप्रिलमध्ये खुला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौरांना कळविले जाईल. महापौरांमार्फत उद्‌घाटनाचे नियोजन होईल. मात्र, या प्रकल्पामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटून नागरिकांना सिग्नल फ्री प्रवास करता येणार आहे. बीआरटी बसचाही वेळ तीन मिनिटांनी वाचेल.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी विभाग

पिंपरी - वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाकड फाट्याजवळ विकसित करण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिकेने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता पाच महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे ‘भुयारी मार्गाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्‍न रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागलेले नोकरदार विचारत आहेत. दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. 

‘वाकड रोड’ म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता हिंजवडी उड्डाण पुलाजवळ पुणे-बंगळूर म्हणजेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाला जाऊन मिळतो. त्यामुळे या रस्त्यावर प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी अखंडपणे वर्दळ सुरू असते. औंध-सांगवी परिसरात राहणारे आयटीयन्सदेखील हिंजवडीकडे जाण्यासाठी या मार्गाला प्राधान्य देतात. साहजिकच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढल्याने तो अपुरा पडू लागला होता. परिणामी, वाहतूक कोडीचा प्रश्‍न गंभीर झाला होता. 

नागरिकांची या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आराखडा तयार करून महापालिकेच्या बीआरटी विभागाने २०१६ मध्ये भुयारी मार्गाचे प्रत्यक्ष काम हाती घेतले. दीड वर्षाच्या मुदतीत ते पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली. ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत प्रकल्पाचे पहिले दोन टप्पे म्हणजेच सेवा रस्ते व जगताप डेअरीकडील रॅंपचे काम पूर्ण होऊन, औंध दिशेकडील काम हाती घेण्यात आले होते. कामाचा वेग लक्षात घेऊन पुढील दोन ते तीन महिन्यांत भुयारी मार्ग पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्‍वासन महापालिकेकडून देण्यात आले. त्याला पाच महिने उलटूनही तो खुला न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Web Title: marathi news pimpri news y junction road