"सीएसआर'मधून पाच रुग्णालयांत "आयसीयू' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - "कंपन्यांची सामाजिक जबाबदारी'च्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) निधीतून शहरातील कमला नेहरू रुग्णालयासह पाच रुग्णालयांमध्ये महापालिकेच्यावतीने अतिदक्षता विभाग (आयसीयू) उभारण्यात येणार आहेत. या वर्षी पालिकेकडून शहरी गरीब योजनेसाठी 20 कोटी रुपयांसह "आरोग्य' विभागासाठी पावणेतीनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

पुणे - "कंपन्यांची सामाजिक जबाबदारी'च्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) निधीतून शहरातील कमला नेहरू रुग्णालयासह पाच रुग्णालयांमध्ये महापालिकेच्यावतीने अतिदक्षता विभाग (आयसीयू) उभारण्यात येणार आहेत. या वर्षी पालिकेकडून शहरी गरीब योजनेसाठी 20 कोटी रुपयांसह "आरोग्य' विभागासाठी पावणेतीनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीकडून 2018-19 आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. गतवर्षी आरोग्य विभागासाठी 276 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद केली होती. या वर्षी ही तरतूद तीनशे कोटींच्या घरात गेली आहे. त्यामध्ये "सीएसआर'च्या माध्यमातून कमला नेहरू रुग्णालय, भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालय, येरवडा येथील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय, शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालय आणि कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार प्रसूतिगृह या पाच रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे. तसेच, शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी "शहर आरोग्य नियोजन' (सिटी हेल्थ प्लॅन) तयार केला आहे. एका खासगी संस्थेसोबत सामंजस्य करार करून पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये अतिजोखमीच्या गरोदर माता, गुंतागुंतीच्या प्रसूती, नवजात अर्भकांची विशेष काळजी घेण्यासाठी चार विशेष केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. 

शहरी गरीब योजनेसाठी विविध प्रकल्प राबविण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीत झोपडपट्ट्या व अन्य भागांत राहणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न एक लाख इतके आहे अशा आर्थिक दुर्बल घटकांतील पिवळे रेशन कार्डधारक गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 50 टक्के हमीपत्रासह लाभ दिला जातो. शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेमध्ये 1 एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 पर्यंत 9 हजार 803 रुग्णांना मदत करण्यात आली आहे. 

आरोग्य विभागाच्या आगामी वर्षातील योजना 
- केंद्र सरकारच्या "सीआरएस' प्रणालीत जन्म- मृत्यू नोंदणीचे जतन व संगणकीकरण 
- सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये श्‍वानवाहने उपलब्ध करून कुत्र्यांची नसबंदी करणे 
- कैलास स्मशानभूमीत जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्प 
- शहरातील महापालिकेच्या पाच रुग्णालयांमध्ये "आयसीयू' उभारणी

Web Title: marathi news PMC CSR hospital pune