उत्पन्नासाठी नव्हे, तर वाहतुकीसाठी व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - वाहनतळ धोरण (पार्किंग पॉलिसी) म्हणजे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन नाही, तर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर वाहने उभे करण्याचे व्यवस्थापन आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे. रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठीचे शुल्क माफक असेल, असाही निर्वाळा त्यांनी दिला. 

पुणे - वाहनतळ धोरण (पार्किंग पॉलिसी) म्हणजे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन नाही, तर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर वाहने उभे करण्याचे व्यवस्थापन आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे. रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठीचे शुल्क माफक असेल, असाही निर्वाळा त्यांनी दिला. 

महापालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. त्याअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येणार आहे. शहरात वाहने नियंत्रित पद्धतीने उभी करण्यात यावी, रस्त्यांचा वापर पुरेपूर व्हावा, असाही या पॉलिसीचा उद्देश आहे. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक स्वयंसेवी संस्थांनीही या पॉलिसीला पाठिंबा दिला असून, ती लवकर लागू करण्याचा आग्रह धरला आहे. पार्किंग पॉलिसीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यावर १३ मार्च रोजी निर्णय होणार आहे. 

शहराला पार्किंग पॉलिसीची आवश्‍यकता का आहे, हे सांगताना कुणाल कुमार म्हणाले, ‘‘पुण्यातील सर्वांत मोठी समस्या ही वाहतुकीची कोंडी आहे. त्यातून प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. सध्या रस्त्यावर अनियंत्रित पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यांचाही पुरेपूर वापर होत नाही आणि त्यातूनही कोंडी वाढत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी दूरगामी विचार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करणे  आवश्‍यक आहे.’’

रस्त्यांवर सध्या दिवस दिवस एकच वाहन उभे असते, असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. त्यामुळे रस्त्यांचाही पुरेपूर वापर होत नाही व त्या भागातील अन्य नागरिकांनाही त्या जागेचा वापर करता येत नाही. तसेच रस्त्यावर अनियंत्रित पद्धतीने वाहने उभी करण्यावर मर्यादा आणणे गरजचे आहे. अनेक ठिकाणी वाहनचोरीच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहनांची सुरक्षितताही जोपासली जाऊ शकते. 
- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका 

पार्किंगचे दर माफकच
पार्किंग पॉलिसीअंतर्गत रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणारे शुल्क माफक असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. उत्पन्नवाढीसाठी ही पॉलिसी नाही, हेही नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. पे अँड पार्कमधून मिळणारे उत्पन्न वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी आणि शाश्‍वत वाहतुकीसाठीच वापरले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

(क्रमशः)

Web Title: marathi news PMC Management for transportation