"मेट्रो'चे काम सुरू होण्यास आणखी एक महिना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागण्याची शक्‍यता आहे. महामेट्रोने पौड रस्त्यावरील खांबांची पूर्तता आणि अनुषंगिक कामांवर लक्ष केंद्रित केले असल्याने कर्वे रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना आणखी काही काळ दिलासा मिळणार आहे. 

पुणे - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागण्याची शक्‍यता आहे. महामेट्रोने पौड रस्त्यावरील खांबांची पूर्तता आणि अनुषंगिक कामांवर लक्ष केंद्रित केले असल्याने कर्वे रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना आणखी काही काळ दिलासा मिळणार आहे. 

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या वनाज-रामवाडी मार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व बदल करण्यात आले आहेत. वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदामदरम्यान मेट्रोचे काम गेल्या वर्षीपासून सुरू झाले. पौड रस्त्यावर वनाज येथून कामाला सुरवात केल्यानंतर आता सावरकर उड्डाण पुलापर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आले असून, खांबांच्या पायासाठी खड्डे घेण्यासही सुरवात झाली आहे. आयडियल कॉलनीजवळच्या या मार्गावरील पहिल्या दोन खांबांचे काम पूर्ण झाले असून, आता या खांबांवर सेगमेंट उभारण्याची तयारी सुरू आहे. खांबांवर सेगमेंट उभारणीचा टप्पा महत्त्वाचा असल्याने सध्या सर्व मनुष्यबळ याच ठिकाणी लावण्यात आले आहे. त्यामुळे कर्वे रस्त्यावरील प्रत्यक्ष काम पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी शुक्रवारी दिली. 

आयडियल कॉलनी येथील स्टेशनचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले असून, आता वनाज येथील स्टेशनच्या कामाला सुरवात करण्यासाठी सर्व पूर्वतयारी झाली आहे. वनाजनंतर आनंदनगर येथील स्टेशनचे काम सुरू होणार आहे, असे बिऱ्हाडे यांनी सांगितले. नदीपात्राच्या कडेने पाच खांबांच्या पायाची उभारणी पूर्ण झाली आहे. आता या ठिकाणी खांबांचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

पालक-विद्यार्थ्यांना तूर्त दिलासा 
कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाले, तर या परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची भीती आहे. विशेषत: सध्या परीक्षांचा काळ सुरू असल्याने या भागातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे तूर्तास हे कामच पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याने पालक-विद्यार्थी यांचीही सुटका होणार आहे. 

Web Title: marathi news pmc pune metro