पायाभूत सुविधांपासून बस स्थानके दूरच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था, वेळापत्रक आदी किमान पायाभूत सुविधा शहर परिसरातील 75 पैकी अवघ्या 16 बस स्थानकांवर उपलब्ध असल्याची कबुली पीएमपी प्रशासनाने माहिती अधिकाराअंतर्गत नुकतीच दिली आहे. 

पुणे - पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था, वेळापत्रक आदी किमान पायाभूत सुविधा शहर परिसरातील 75 पैकी अवघ्या 16 बस स्थानकांवर उपलब्ध असल्याची कबुली पीएमपी प्रशासनाने माहिती अधिकाराअंतर्गत नुकतीच दिली आहे. 

शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे 75 हून अधिक पीएमपीची बस स्थानके आहेत. त्यापैकी किती स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वेळापत्रक, प्रथमोपचार साहित्य, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, अग्निशमन उपकरणे आदी पायाभूत सुविधा आहेत, असे प्रश्‍न माहिती अधिकाराअंतर्गत पीएमपी प्रवासी मंचचे सदस्य रूपेश केसेकर यांनी प्रशासनाला विचारले होते. ही साधने उपलब्ध आहेत, अशा स्थानकांची यादी मिळावी, असेही त्यांनी म्हटले होते. 

बस स्थानकांची यादीही माहिती अधिकारात उपलब्ध झाली नसल्याने केसेकर यांनी पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. ते म्हणाले, ""स्वारगेटवरील प्रवाशाला हिंजवडीला जायचे असेल किंवा चाकणवरून आलेल्या प्रवाशाला मनपा स्थानकावरून धनकवडीला जायचे असेल तर कसे जायचे, याचीही माहिती सध्या मिळत नाही. पीएमपीच्या ऍपची माहिती प्रवाशांपर्यंत पोचविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.'' 

प्रशासनाकडून मिळालेले उत्तर 
- पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि विश्रांतिगृह या सुविधा मनपा भवन, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, महात्मा गांधी, हडपसर गाडीतळ, कात्रज, माळवाडी, कोथरूड, निगडी, भोसरी, पुणे स्थानक, किवळे, मोलेदिना, अप्पर इंदिरानगर आणि खडकी बाजार या स्थानकांवर उपलब्ध आहे. 
- गणपती माथा स्थानकावर पाणी आणि विश्रांतिगृह आहे; परंतु स्वच्छतागृह नाही. 

पीएमपीच्या शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील बस स्थानकांवरून दररोज सुमारे 11 लाख प्रवासी ये-जा करतात; परंतु त्यांना पाणी, स्वच्छतागृह, प्रथमोपचाराचे साहित्य आदी किमान सुविधाही मिळत नाहीत. त्या कोणत्या स्थानकांवर उपलब्ध आहेत, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही, ही खेदाची बाब आहे. 
- रूपेश केसेकर, पीएमपी प्रवासी मंच 

Web Title: marathi news PMC pune PMP Bus stop