बांधकाम पर्यावरणपूरकच असावे - मेढेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पुणे - ""कोणतेही बांधकाम करताना ते पर्यावरणपूरक असावे आणि बांधकाम करताना टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर व्हावा,'' असे आवाहन बांधकाम अभियंता प्रकाश मेढेकर यांनी नुकतेच केले. "सकाळ' प्रकाशन आणि "असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनिअर्स डेव्हलपमेंट' यांनी आयोजिलेल्या तांत्रिक व्याख्यान सत्रात "बांधकाम क्षेत्रातील बदलते प्रवाह' या विषयावर ते बोलत होते. 

याच सत्रात "संरचनेचे महत्त्व' या विषयावर बोलताना सतीश मराठे म्हणाले, ""अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रात होणारे तांत्रिक बदल स्वीकारून आपल्या कामात प्रगती करावी.'' बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व सुविधांची सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या मेढेकर यांच्या "दिशा... बांधकाम नवनिर्मितीची' या "सकाळ' प्रकाशित पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने व्याख्यान झाले. 

अभियांत्रिकी शिक्षणाचा प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपयोग करण्यावर मराठे यांनी भर दिला. कोणतेही काम करण्याआधी त्यामागील तांत्रिक बाजू समजून घेण्याची गरज मांडली. गुणवत्तेशी तडजोड करून केलेले काम नेहमीच महागात आणि गुणवत्तापूर्ण काम नेहमीच कमी पैशात होते. बांधकाम साहित्याची बचत ही नफ्यातील वाढ असते, त्यामुळे नैसर्गिक राष्ट्रीय संपत्तीचीही बचत होते, असेही मराठे म्हणाले. 

असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनिअर्स डेव्हलपमेंट संस्थेचे पदाधिकारी प्रकाश भट यांनी असोसिएशनविषयी माहिती दिली. सकाळ प्रकाशनाच्या संपादिका ऐश्वर्या कुमठेकर यांनी व्याख्यान सत्र आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या "सकाळ प्रकाशन'च्या पुस्तकांना उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन रियाझ पटेल यांनी, तर आभार प्रदर्शन निखिल शहा यांनी केले.

Web Title: marathi news prakash medhekar construction