या सरकारने आत्तापर्यंत झोपा काढल्या काय?: अजित पवार

राजकुमार थोरात 
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

राजस्थानमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ही ममता बॅनजीने भाजपचा पराभव केला आहे. गुजरात कसेबसे वाचले. भाजपलाही आपला फार काळ नाही हे माहीत झाले आहे.

वालचंदनगर - २०१९ ला सरकारची मुदत संपत असताना शेतकऱ्यांना २०२० नंतर उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देण्याचे व २०२२ साली सर्वांना घरे देण्याची खोटी स्वप्नं दाखवली जात असून सरकारने आत्तापर्यंत झोपा काढल्या का, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

जंक्शन (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने उपस्थित होते. 

राजस्थानमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ही ममता बॅनजीने भाजपचा पराभव केला आहे. गुजरात कसेबसे वाचले. भाजपलाही आपला फार काळ नाही हे माहीत झाले आहे. २०१९ सरकारची मुदत संपत असताना २०२० व २०२२ मध्ये काय कामे करणार आहे. आत्तपर्यंत त्यांना झोपा काढल्या का? राज्यामध्ये कांद्याचे भाव पडले, गतवर्षीपेक्षा द्राक्षांना कमी दर मिळू लागला आहे. डाळिंबाचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. साखरेचे दर साडेतीन हजारावरुन अठ्ठावीशे रुपयांपर्यंत आले आल्याने साखर कारखाने २०० रुपये कमी देवू लागले आहेत. ऊस दराचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पन्नासवेळा सांगितले आहे की, तुमचे ही तीन साखर कारखाने असून ऊस दराचे तेवढ बघा? मात्र बैठका घेवू असंच म्हणत आहेत. शेतकरी सरकारवरती समाधानी नाही. केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून बजेट मांडले आहे. मात्र बजेटमधील आकडे हे फसवे असून सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Web Title: marathi news pune ajit pawar against bjp