बारामतीत शिवजयंतीची मिरवणूक

मिलिंद संगई
रविवार, 4 मार्च 2018

आज सकाळी नऊ वाजता कसब्यातील शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.

बारामती - छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज बारामतीत अत्यंत उत्साहाने व जोरदार साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या असून पावला पावलावर विविध संस्था व संघटनांनी शिवजयंतीच्या मिरवणूकीचे स्वागत करण्यासाठी स्टेज उभारलेले दिसून आले. आज बारामती शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. 

दरम्यान आज सकाळी नऊ वाजता कसब्यातील शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल शिंदे, संभाजी होळकर, हेमंत नवसारे, सुभाष ढोले, बबलू देशमुख, प्रशांत सातव, अँड. राजेंद्र काळे, सूरज सातव, सुनील सस्ते, इम्तियाज शिकीलकर, प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, संजय ढवाण, दिलीप ढवाण, अँड. विनोद जावळे, अँड. नितीन भामे, दीपक मलगुंडे, छगन आटोळे, विष्णुपंत चौधर, देवेंद्र बनकर, राजेंद्र ढवाण, सुनील सातव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

खड्या आवाजातील पोवाड्यांनी आज बारामती दुमदुमून गेली होती. शिवभक्तांचा उत्साह आज प्रत्येक ठिकाणी दिसून येत होता. मोटारसायकलींपासून चार चाकीपर्यंत भगवे झेंडे डौलाने फडकताना दिसत होते. संध्याकाळी निघणाऱ्या मिरवणूकीचीही जय्यत तयारी करण्यात आली होती. या मिरवणूकीमध्ये हत्ती, घोडे, ढोल ताशा तसेच पारंपरिक नृत्य, लाठी काठी व मर्दानी खेळ सादर केले जाणार आहेत. बारामती शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन ही मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. 

 

Web Title: marathi news pune baramati shivaji maharaj