तीन दिवसापासून अडकलेल्या घारीला जीवनदान

संदीप घिसे 
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

तीन दिवसांत पोटात अन्नाचा कणही न गेल्याने जिवाच्या आकांताने ती ओरडत होती. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने तिची रविवारी (ता. ४) दुपारी ४५ फूटांवरून सुखरूप सुटका केली.

पिंपरी - गेल्या तीन दिवसांपासून पतंगीच्या मांज्यामध्ये अडकलेली घार सुटकेसाठी प्रयत्न करीत होती.  मांजामुळे तिला जखमाही झाल्या होत्या. तीन दिवसांत पोटात अन्नाचा कणही न गेल्याने जिवाच्या आकांताने ती ओरडत होती. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने तिची रविवारी (ता. ४) दुपारी ४५ फूटांवरून सुखरूप सुटका केली.

कासारवाडी येथील पेट्रोल पंपाजवळील पिंपळाच्या झाडावर पतंगाच्या मांजामध्ये एक घार तीन दिवसांपूर्वी अडकली. ती सुटकेसाठी प्रयत्नही करीत होती. मात्र तिच्या प्रयत्नांमुळे ती आणखीनच अडकून पडली. धारदार मांजामुळे तिला जखमाही झाल्या होत्या. त्यातच तीन दिवसांपासून सुटकेसाठी चाललेल्या प्रयत्नांमुळे अन्नाचा कणही तिच्या पोटात गेला नव्हता. आत्ता तर कावळेही तिला जाता येता चोच मारू लागले. यामुळे जिवाच्या आकांताने ती ओरडू लागली. रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रकांत गायकवाड यांनी अग्निशामक दलास कळविले. त्यानुसार, श्रावण चिमटे, नवनाथ शिंदे, लक्ष्मण होवाळे, विवेक खंडेवाड, रामदास गर्जे, विशाल पोटे आणि सुरज गवळी या अग्निशामक दलाच्या जवानांनी घारीची सुटका केली. ही घार आत्ता पक्षीप्रेमीकडे उपचारासाठी दिली आहे

Web Title: marathi news pune Black kite rescue