शिक्षणाचा उपयोग सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी करा - डॉ. मुरुमकर 

राजकुमार थोरात
सोमवार, 5 मार्च 2018

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परस्थितीची जाणीव ठेवून आई, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. - डॉ. मुरुमकर

वालचंदनगर - विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी करण्याची गरज असल्याचे मत बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी व्यक्त केले. कळंब (ता. इंदापूर) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पदवीग्रहण समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

यावेळी संस्थेचे खजिनदार हनुमंराव रणसिंग, विश्‍वस्त प्रकाश कदम, वीरसिंह रणसिंग, प्राचार्य डाॅ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ. बबन भापकर, शिवाजी कदम, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी अरुण कांबळे, रामचंद्र पाखरे उपस्थित होते. यावेळी मुरुमकर यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थी शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी, उपजिवेकेसाठी असल्याचे मानत आहे. मात्र शिक्षणाचा उपयोग केवळ स्वत:साठी मर्यादित न ठेवता समाजातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी करणे गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजातील नागरिकांना दिशा देण्याचे काम केल्यास खऱ्या अर्थाने शिक्षण पूर्ण झाले असे मानता येईल. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परस्थितीची जाणीव ठेवून आई, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रत्येक विद्यार्थी निश्‍चित यशस्वी होण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत शिंदे व तेजश्री हुंबे, प्रास्ताविक विलास बुवा, आभार महादेव कदम यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीचे प्रमाणापत्र देण्यात आले.

 

Web Title: marathi news pune education program university speech