दौंड उपनगराध्यक्षपदी मटका प्रकरणी तीन वेळा अटक झालेले उमेदवार विजयी 

प्रफुल्ल भंडारी 
सोमवार, 5 मार्च 2018

मटका प्रकरणी राजेश जाधव यांना यापूर्वी तीन वेळा अटक झालेली आहे. दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जाधव विजयी झाले आहेत.

दौंड - दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शिवसेना युतीचे राजेश शामराव जाधव विजयी झाले आहेत. राजेश जाधव यांना 14 तर प्रतिस्पर्धी नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे उमेदवार नितीन जनार्दन कांबळे यांना 11 मते मिळाली. मटका प्रकरणी राजेश जाधव यांना यापूर्वी तीन वेळा अटक झालेली आहे. 

दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याकडे आज (ता. 5) सकाळी उपनगराध्यक्षपदासाठी राजेश जाधव आणि नितीन कांबळे या दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोघांमध्ये सरळ लढत झाली. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी माघारीची मुदत संपल्यानंतर हात उंचावून घेतलेल्या मतदानात राजेश जाधव यांना 14 तर नितीन कांबळे यांना 11 मते मिळाल्याने राजेश जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात व सदस्यांच्या हस्ते राजेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. शीतल कटारिया यांच्यासह नगरपालिका सदस्य इंद्रजित जगदाळे, बादशहा शेख, हेमलता परदेशी, माजी सदस्य नंदकुमार पवार यांनी या वेळी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. निवडीनंतर राजेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि त्यानंतर श्री. जाधव यांची प्रमुख चौकातून फटाक्यांच्या आतिषबाजीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.         

राजेश जाधव यांना मटका प्रकरणी 15 फेब्रुवारी 2016, 25 जुलै 2016 व 3 जानेवारी 2017 रोजी अटक झाली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे समर्थक असलेले राजेश जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 5 (ब) मधून निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी गीता राजेश जाधव या मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका होत्या. 

Web Title: marathi news pune elections criminal victory congress shivsena