राज्यातील पहिली रक्त संकलन व्हॅन पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

व्हॅनची वैशिष्ट्ये
 संपूर्ण वातानुकूलित 
 एकाच वेळी दोन दात्यांना रक्तदान करण्याची सुविधा
 रक्त संकलनासाठी दोन ब्लड बॅंक रेफ्रिजरेटर
 दोनशे रक्त पिशव्या साठविण्याची क्षमता
 अकरा रक्तदात्यांची बसण्याची व्यवस्था
 रक्तदान जनजागृतीची सुविधा
 केमिकल टॉयलेट, वॉशबेसिन आणि शॉवरची सुविधा

पुणे - ससून रुग्णालयात अत्याधुनिक रक्त संकलन व्हॅन दाखल झाली आहे. अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेली ही राज्यातील पहिलीच व्हॅन आहे. या माध्यमातून एकाच वेळी दोन दात्यांना रक्तदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ‘रोटरी क्‍लब ऑफ पूना’ने ही व्हॅन ससून रुग्णालयास दिली आहे.

शहरातील वैद्यकीय सुविधांचा सातत्याने विस्तार होत आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल वैद्यकीय तज्ज्ञांमुळे आव्हानात्मक शस्त्रक्रियांची संख्या वेगाने वाढत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच यकृत, हृदय अशा अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियाही बहुतांश मोठ्या रुग्णालयांमधून होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील रक्ताची मागणी वाढली असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबरोबरच रक्तदात्यांनी शिबिरापर्यंत येण्याऐवजी रक्तपेढ्यांनी दात्यांपर्यंत पोचण्याची नवी संकल्पना विकसित होत आहे. त्या माध्यमातून रक्त संकलन व्हॅन विकसित केली आहे. रोटरी क्‍लब ऑफ पूना यांनी ही व्हॅन ससून रुग्णालयास दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीतील सहयोगी प्राध्यापक डॉ. मंगेश सागळे म्हणाले, ‘‘पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विविध रक्तदान शिबिरासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. या व्हॅनमध्ये संकलित रक्ताची शीतसाखळीसाठी योग्य व्यवस्था केली आहे. त्यामुळे दात्यांनी दिलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर होईल.’’

अशी आहे व्हॅन
रक्त संकलन व्हॅन अकरा मीटर लांब आणि दहा फूट रुंद आहे. सातारा येथील अल्फा मोटर्स मॉडिफेकनशकडून ही व्हॅन विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला असून, त्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवेची सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यासाठी ऑक्‍सिजन आणि जीवरक्षक औषधांचा साठा आहे.

मातृदूध संकलन व्हॅनपाठोपाठ आता रक्त संकलन व्हॅन ससून रुग्णालयात दाखल होत आहे. त्यातून या रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता निश्‍चित वाढेल. रक्तदात्यांना रक्तदान करताना पोषक वातावरण असेल, अशी व्यवस्था व्हॅनमध्ये करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दात्यांना रक्तदानाच्या चळवळीत सहभागी करून घेता येईल.
-डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news pune First Blood Collection Van in Pune