कचरा जाळणे धोकादायक!

संदिप जगदाळे
सोमवार, 5 मार्च 2018

भारतात रोज 1.33 लाख टन कचरा निर्माण होतो, पकी फक्त 26 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. बाकी नुसताच टाकला जातो, ज्याच्यासाठी वर्षांला 1240 हेक्टर जमीन लागणार आहे.

हडपसर - हांडेवाडी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार भारतात रोज 1.33 लाख टन कचरा निर्माण होतो, पकी फक्त 26 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. बाकी नुसताच टाकला जातो, ज्याच्यासाठी वर्षांला 1240 हेक्टर जमीन लागणार आहे. याचा आपण नागरिक विचार करणार आहोत का?

सविता मोरे म्हणाल्या, तुमच्या खिडकीच्या समोर तुम्हाला कचराकुंडी ठेवलेली आवडेल का? या प्रश्नावर तुम्ही ‘नाही! मुळीच नाही!’ असे स्पष्टपणे सांगाल. याचे कारण स्पष्ट आहे. मग लोकांच्या अंगणात कचरा जाळला तर नागरिक सहन का करतील? आणि त्याही वरती कचरावेचक साठलेल्या, कुजणाऱ्या कचऱ्यात कसे काम करत असतील याचा विचार आपण कधी केलाय? म्हणूनच कचरा व्यवस्थापनाकडे व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले, कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. फोम कप्स, अंडय़ाचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. डॉक्झिनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते.

जावाजी थिटे म्हणाले, अनेक सफाई कर्मचारीच कचरा पेटवून देताना दिसतात. त्यामुळे सकाळी या भागात सर्वत्र धूर पसरलेला असतो. त्याची झळ परिसरातील झाडांना बसते. रस्त्याने जाणारे नागरिक आणि रहिवाशी यांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांना सूचना देण्याची आणि कारवाई करण्याची गरज आहे. संदेश झेंडे ब्राझील, चीन आणि मेक्सिकोबरोबरच मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही वरचा क्रमांक लागतो.   

2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशातील 30 टक्के नागरिक शहरी भागात राहतात. 468 शहरी वसाहतींमध्ये 100 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली तीन शहरे आणि दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेली 53 शहरे आहेत. आणि म्हणूनच घन कचरा व्यवस्थापन हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे.

दिपाली कवडे म्हणाल्या, आतापर्यंत पर्यावरणावर गोड गोड बोलणाऱ्या भारताने कृतिशील ब्राझील देशाकडून शिकण्याजोगे खूप आहे. ब्राझीलमध्ये धोरणात्मक आराखडा तयार करून कचरावेचकांच्या सहकारी संस्था स्थापणे आणि संघटन; जागा, आणि सुरक्षिततेसाठी देणे; गाड्या देणे आणि शेड उभारणे; सुलभ पत आणि सामाजिक सुरक्षा अशा गोष्टी केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राझील कचरावेचकांना प्रतिकिलोमागे सरकारी निधीतून पर्यावरण सेवा शुल्क देते. हे मालाच्या बाजारी किंमतीच्या पेक्षा वेगळे आहे शिवाय वेचकांना मालाचा बाजारी भावदेखील मिळतो. ब्राझीलबरोबर बऱ्याच गटांमध्ये सहभागी होणारा भारत या बाबतीत किती कृती करेल हे बघण्याजोगे आहे.

Web Title: marathi news pune hadapsar garbage harmful