विशेष मुलांनी उभारले गाड्यांचे विश्व

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुण्यातील 'अब नॉर्मल होम'च्या मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीची आेळख 'वर्ल्ड ऑफ कार्स' या कारच्या प्रदर्शनाने करुन दिली. 350-400 वेगवेगळ्या कार्सची प्रतिकृती या प्रदर्शनात विशेष मुलांनी साकारली.

पुणे - 'अब नॉर्मल होम' या विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्र, कोथरूड येथे काल 'वर्ल्ड ऑफ कार्स' (World of Cars) हे कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात साधारणत: 350-400 वेगवेगळ्या कार होत्या. ज्यामध्ये मसल कार, रेसिंग कार, हायपर स्पोर्ट, कन्सेप्ट कार तसेच विविध आलिशान कार छोट्या प्रतिकृती होत्या. 

'अब नॉर्मल होम' ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून विशेष मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करत आहे. संस्थेमध्ये अध्ययन अक्षम, गतीमंद, मतीमंद, अतिचंचल, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी अशी मुले आहेत. अब नॉर्मल होममध्ये एकूण 45 मुले आहेत. त्या सर्व मुलांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने हे प्रदर्शन उभे राहिले, असे संस्थापक श्री. पंकज मिठभाकरे यांनी सांगितले. अब नॉर्मल होमच्या संचालिका किशोरी पाठक यांनी ही कल्पना कशी सुचली हे सांगताना सांगितले की, 'एक दिवशी शाळेतील एका मुलाने त्यांच्याकडे असलेल्या कार दाखवायला आणल्या, ज्या साधारण 100-125 कार होत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्या मुलाला गाड्यांची बरीचशी माहिती होती.' तसेच इतर मुलांशी गाड्यांबद्दल बोलल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की हे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. म्हणून मग प्रदर्शनाची सुरवात झाली. शाळेतील शिक्षक शुभम गायकवाड याने या कल्पनेवर विचार सुरु करून शाळेतील मुलांच्या मदतीने एक एक गोष्ट उभी करायला सुरवात केली. मग स्टेडीयम, शोरूम, ट्रक या गोष्टी एक एक करत तयार झाल्या आणि मुलांना स्वप्नवत वाटणारं 'World of Cars' वास्तवात आले.

world of cars

अशाच काही कारस् ची प्रतिकृती बनविणाऱ्या काही मुलांनी आपले अनुभव व्यक्तं केले. पैकी श्रेयस सांगतो, 'किशोरी ताई, जेव्हा म्हणाली की आपण कारचं प्रदर्शन करणार आहोत, तेव्हा खूप भारी वाटलं. आणि मी माझ्या कल्पना सांगू लागलो. प्रदर्शनात खूप मज्जा आली. खूप लोक आले होते आणि ते आम्हाला प्रश्नं विचारत होते. माहिती सांगताना मस्तं वाटत होतं. मी या शाळेत सहा वर्षांपासून आहे आणि मला या शाळेत यायला खूप आवडतं. कारण शिकताना आम्हाला स्वातंत्र्य दिलं जातं. तर आकाश म्हणाला, 'मला कारची माहिती होती आणि ती लोकांना सांगताना मजा येत होती. प्रदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला. खूप मस्त वाटलं. आमच्या शाळेत खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. ज्या आम्ही आमच्या पध्दतीने शिकतो'. ओंकार म्हणतो, 'प्रदर्शनात खूप मजा आली. कारच्या प्रदर्शनाबरोबर वेगवेगळे स्टॉलपण लावले होते. लहान मुलांना खूप मजा येत होती. रोजच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी आम्ही शाळेत शिकतो आणि हसत खेळत शिकतो. मी या शाळेत तीन वर्षांपासून आहे.'  

world of cars
 
world of cars

world of cars

Web Title: marathi news pune kothrud abnormal childrens cars exhibition