खेळाडूंना उत्पन्नाचे साधन देणे गरजेचे

खेळाडूंना उत्पन्नाचे साधन देणे गरजेचे

 
प्रश्‍न - आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू निर्माण करण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे. यापूर्वी असे प्रयत्न झाले; परंतु अपेक्षित परिणाम दिसून येत नाही याची कारणे काय?
- खेळाडू घडविण्यासाठी त्याची स्वत-ची इच्छाशक्ती हा महत्त्वाचा भाग असला, तरी त्याला पूरक वातावरण निर्माण करणे हे संबंधित संघटना आणि सरकारची जबाबदारी आहे. एखाद्या खेळाडूला मिळालेले यश, प्रसिद्धी ही इतर खेळाडूंना प्रेरणादायी ठरत असते. क्रीडापटूंच्या दृष्टीने रोजगार हा महत्त्वाचा भाग आहे. त्याला उत्पन्नाचे साधन मिळवून देणे गरजेचे आहे. एखाद्या खेळाडूने किमान राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली, तर त्याला नोकरीची हमी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने नोकरी मिळत गेली, तर निश्‍चितच चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार होतील. ते भविष्यात निश्‍चितच चांगली कामगिरी करतील, असा मला विश्‍वास आहे. खेळाडू निर्माण का होत नाहीत, याचे मूळ कारण तेच आहे. अनेक कुटुंबांत मुलांना क्रीडापटू होण्यापासून रोखले जाते, कारण खेळाडू होऊन त्याला मिळणार काय? ॲथलेटिक्‍स असो किंवा इतर खेळ असो.

भविष्याची चिंता असल्याने अनेक पालक मुलांना क्रीडापटू होण्यापासून थांबवतात. नोकरीची हमी मिळाली, तर पालकही मुलांना प्रोत्साहन देतील.

प्रश्‍न - सरकारच्या स्तरावरून ॲथलेटिक्‍स किंवा इतर खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही, असे वाटते का?
- असे नाही; सर्वच पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. क्रीडा मंत्रालय आणि संबंधित क्रीडा प्रकारांची एक समिती स्थापन केली पाहिजे. क्रीडा प्रकारांचा विकास आणि खेळाडूंना नोकरी उपलब्ध करून देण्याचे काम या समितीमार्फत झाले पाहिजे. क्रिकेटला या खेळात मोठी प्रसिद्धी आणि पैसा मिळत आहे; परंतु फार थोड्या देशांत हा खेळ खेळला जातो. भारताची कामगिरी या खेळात चांगली होती. भारताला मिळणाऱ्या यशामुळे नागरिकांना तो अधिक आवडत आहे. इतर खेळांतदेखील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर निश्‍चितच त्या क्रीडा प्रकाराचा प्रसार, त्याची आवड निर्माण होऊन अधिक चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात. बॅडमिंटन हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या खेळातही आता पैसा उपलब्ध होत आहे. 
 
प्रश्‍न - सुमारे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचे ऑलिंपिक स्पर्धेतील प्रदर्शन समाधानकारक का होत नाही?
- आपली कामगिरी चांगली होत नाही हे सत्य आहे. आपल्या खेळाडूंना अधिक मेहनत करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शिस्त पाळणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्‍यक आहे. या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देणाऱ्या, त्यांना घडविणाऱ्या प्रशिक्षकांची गरज आहे. क्रीडा मंत्रालयाने खेळाडू, प्रशिक्षकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचे परिणाम निश्‍चितच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत दिसून येतील. त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी टाकली पाहिजे. या संदर्भात क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्याशी मी चर्चा केली आहे. त्यांना प्रत्येक खेळाच्या संघटनांशी चर्चा करण्यास सांगितले असून, प्रत्येक संघटनेकडून आराखडा, प्रस्ताव तयार करून घेण्यास सांगितले आहे. त्यांना मिळालेल्या निधीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी संघटनांवर टाकली पाहिजे. आपल्याकडे सगळे आहे; पण प्रयत्नात आपण कमी पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com