...अन् घट्ट नात्यात प्रेम बांधले गेले!

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कोणीतरी पुढाकार घेऊन केलेल्या ‘पहिल्या प्रपोज’मुळे आयुष्यभराची साथ गुंफली जाते अन्‌ प्रेम यशस्वी होते... अशीच काही जोडपी आहेत की, ज्यांनी एकमेकांना प्रपोज केले अन्‌ ते प्रेम एका घट्ट नात्यात बांधले गेले... ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ‘तो’ व ‘ती’च्या प्रपोजची कहाणी...

कोणीतरी पुढाकार घेऊन केलेल्या ‘पहिल्या प्रपोज’मुळे आयुष्यभराची साथ गुंफली जाते अन्‌ प्रेम यशस्वी होते... अशीच काही जोडपी आहेत की, ज्यांनी एकमेकांना प्रपोज केले अन्‌ ते प्रेम एका घट्ट नात्यात बांधले गेले... ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ‘तो’ व ‘ती’च्या प्रपोजची कहाणी...

...अन्‌ प्रेमाची जाणीव झाली
प्रणव मेहता आणि श्रुती गुजर हे एका सोसायटीत राहणारे आणि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखणारे... दोघांमध्येही मैत्रीचे नाते होतेच... पण, त्यांना प्रेमाची जाणीव करून दिली ती मित्रांनी... एकमेकांवर प्रेम असल्याचे समजताच प्रणव याने श्रुतीला प्रपोज केले अन्‌ दोघेही अतूट नात्यात अडकले... काही दिवसांनी त्यांचे लग्न झाले... श्रुती म्हणते, ‘‘एकमेकांना समजून घेणे, वेळ देणे, आवडीनिवडी जपणे या गोष्टीही तितक्‍याच गरजेच्या आहेत. ती किंवा त्याने साधे चॉकलेटही गिफ्ट केले तरी आपल्याला आनंद झाला पाहिजे.’’

प्रेम होत गेले अन्‌ नातेही बहरले
श्‍वेता कारंडे ही गुजराथी आणि किरण करांडे हा मराठी... पण, दोघेही लहानपणापासूनचे मित्र... अगदी शाळेपासून ते दोघे एकमेकांना आवडत होते... पण, दोघांपैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केले नाही... काळानुसार त्यांच्यातील मैत्री घट्ट होत गेली अन्‌ त्यांच्यातील प्रेमही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांना प्रपोज करायची गरज पडली नाही. त्यांच्या नात्याबद्दल दोघांच्याही घरी माहिती होती. पण, किरण हा मराठी आणि ती गुजराथी असल्यामुळे तिच्या घरात व्हायचा तो विरोध झालाच. पण, कालांतराने हा विरोधही मावळला आणि त्यांनी मागच्या वर्षी लग्न केले. १३ फेब्रुवारी हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस तर दुसऱ्या दिवशी १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे... दोन्ही दिवस त्यांच्यासाठी प्रेमाचे... आपल्या नात्याबद्दल किरण म्हणतो, ‘‘आम्हाला प्रेम व्यक्त करायला असे निमित्त लागले नाही. प्रेम होत गेले अन्‌ नातेही बहरत गेले. इतक्‍या वर्षांनंतर आजही आमच्यातली बाँडिंग टिकून आहे ती पण श्‍वेतामुळे. कारण, तिने नाते वेगळ्यारीतीने गुंफले आहे.’’

नाते अधिक दृढ झाले
संदीप कुवर आणि सुश्‍मिता हे दोघेही एकाच विभागात काम करणारे... नोकरीच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली आणि सुश्‍मिता पाहताक्षणी संदीपच्या प्रेमात पडली... तिनेच त्याला प्रपोज केले आणि त्या दोघांनी चार वर्षांपूर्वी लग्न केले. चार वर्षांत दोघांमधील नाते अधिक घट्ट आणि मजबूत बनले आहे. कारण, दोघेही एकमेकांपासून काहीही लपवीत नाहीत. त्याला काय वाटते आणि तिला काय वाटते हे दोघेही बिनधास्तपणे एकमेकांशी शेअर करतात. त्यामुळेच त्यांचे नाते टिकले आहे. दोघेही एकमेकांना वेळ देतात. कुठेतरी नात्याला पुरेसा वेळ दिल्यामुळेच आज संदीपचे नाते सुश्‍मिताशी अधिक मजबूत झाले आहे. संदीप म्हणतो, ‘‘सुश्‍मिताच मला खूप सांभाळून घेते. वादविवाद नात्यात होत असतात. मुळात आम्ही एकमेकांना पुरेसा वेळ दिल्याने आमच्यातील नाते अधिक दृढ झाले आहे.’’ 

मैत्री प्रेमाच्या धाग्यात बांंधली
पूर्वा आणि स्वप्नील (नाव बदलले आहे) हे दोघेही फर्ग्युसन महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत होते. एकाच वर्गात असल्यामुळे दोघांचा मित्र-मैत्रिणींचा ग्रुपही एक होता. दिवसभर हिंडणे-फिरणे आणि गप्पा-गोष्टींमध्ये महाविद्यालयाचे दिवस निघून जात होते. पण, पूर्वा स्वप्नीलवर प्रेम करत होती.  स्वप्नीलकडे प्रेम व्यक्त करायला ‘ती’ भीत होती. पण, महाविद्यालय संपण्यापूर्वी  स्वप्नीलला प्रपोज करायचे तिने ठरवले आणि कट्ट्यावर एकदा गप्पा मारताना पूर्वाने  स्वप्नीलला प्रपोज केले. मात्र, पूर्वाच्या प्रपोज करण्याने  स्वप्नील पुरता गोंधळला होता. म्हणून तिला ‘हो’ म्हणण्यासाठी त्याने काही दिवस घेतले. परंतु, पूर्वाच्या प्रपोज करण्याने त्यांची मैत्री प्रेमाच्या धाग्यात बांधली गेली. आज त्यांचे लग्न झाले असून, त्यांना एक मुलगीही आहे.  पूर्वाने प्रपोज केले नसते तर मला ‘प्रेम’ कळलेच नसते, असं  स्वप्नील सांगतो आणि आपल्या घट्ट नात्याचे श्रेय तो पूर्णपणे पूर्वाला देतो. 

जोडीदार अन्‌ चांगले मित्रही
अमित आणि सुषमा (नाव बदलले आहे) एकाच ग्रुपमधले... हिंडणे-फिरणे आणि मज्जामस्ती करणाऱ्या या ग्रुपमधले एक जोडपे सोडले तर सगळेजण ‘सिंगल’ स्टेट्‌सवाले... सुषमा आणि अमित हे दोघेही ‘सिंगल’ स्टेट्‌स मिरवणारे... सतत भांडणारे. पण, म्हणतात ना. भांडणामध्येही प्रेम दडलेले असते अन्‌‌‌ आपुलकीही... या भांडणानेच दोघांना जवळ आणि प्रेमाच्या घट्ट बंधात बांधले... एकदा पानशेतला फिरायला गेलेल्या अमितने सुषमाला प्रपोज केले... गुलाबपुष्प देऊन त्याने सुषमाला प्रपोज केले अन्‌ तिने क्षणाचाही विचार न करता अमितला होकार दिला... आज जोडीदार असण्यासह दोघेही चांगले मित्र आहेत. सुषमा सांगते, ‘‘आम्ही भांडत असलो तरी आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. अमित मला नेहमीच समजून घेतो आणि साथ देतो. त्यांच्या समजून घेण्यामुळे आमचे नाते अजूनही 
घट्ट झाले आहे.’’

नात्याला फुलवणे महत्त्वाचे
वैशाली ही बंगाली आणि आमीर हा मुस्लिम (नाव बदलले आहे)... येथे जात नाहीतर धर्मच वेगळे... पण, प्रेमाचा बंध मात्र एकच... आमीरने वैशालीला पाहिले अन्‌ तो प्रेमातच पडला... त्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली... दोघांच्याही कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहाला विरोध केला अन्‌ दोघांनी पळून जाऊन लग्न केले. आज दोघेही सुखाने संस्कार करत असून, त्यांच्या लग्नाला दहा ते बारा वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. आपल्या नात्याबद्दल आमीर म्हणतो, ‘‘धर्म वेगळा असला तरी माणुसकीच्या पलीकडे कोणताही धर्म नसतो. प्रेम हे नात्याला फुलवते आणि वेगळाच अवकाश देते. मी किंवा तिने प्रपोज करण्याने काही होत नाही तर नात्याला फुलवणे हे महत्त्वाचे असते.’’ 

प्रेम व्यक्त करायला शिका
कमलेश आणि रिचा दोघेही ‘सीएस’च्या क्‍लासमध्ये भेटले... चांगली मैत्री होती... रिचाने त्याला प्रपोज केले आणि कमलेशने तिला होकार दिला... पण, यात विशेष काय?, असा विचार मनात येईल... तर या दोघांनी आपल्या घरच्यांपासून नाते कधीही लपवले नाही. तो सिंधी आणि ही मराठी. आपल्या घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचे नाही, हे त्यांनी ठरविले आणि घरच्यांना याबाबत माहिती दिली. विरोध तर झालाच. पण, आज त्यांचे हे नाते घरच्यांनी मनापासून स्वीकारले आहे...लवकरच ते लग्नही करतील. तिने प्रपोज केले म्हणून आम्ही आज नात्यात असल्याचे कमलेश सांगायला विसरत नाही. कमलेश म्हणतो, ‘‘आपले प्रेम आयुष्यभर सोबत असावे यासाठी वेळ निघून जाण्याआधी प्रेम व्यक्त करा.’’ 

कॅंडल लाइट डिनर, लाँग ड्राइव्ह अन्‌ भेटवस्तू
‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असे म्हणणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस खूपच खास आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधत आपल्या प्रेमाला शुभेच्छा देण्यासाठी तरुणाईने विशेष नियोजन केले आहे. कॅंडल लाइट डिनर, लाँग ड्राइव्ह आणि भेटवस्तूंचाही पर्याय काहींनी निवडला आहे. याचबरोबर सोशल नेटवर्किंग साइट्‌स, व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटर आणि इन्स्टाग्राम साथीला आहेच. प्रेमात रंगण्याचा अन्‌ जिवलगाविषयीच्या भावनांना शब्दरूप देण्याच्या या दिवसासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. 

नेहमीप्रमाणे यंदाही गुलाबाची फुले मोठा भाव खात असून, प्रेमाचे संदेश पाकळ्यांवर लिहिलेले गुलाब आणि प्रिंटेड पुष्पगुच्छांचा नवीन पर्याय तरुणाईला आकर्षित करत आहे. कॅंडल लाइट डिनर, लाँग ड्राइव्ह आणि एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या व्हॅलेंटाइनसमवेत प्रेमाचा दिवस साजरा करण्याचेही बेत आखले आहेत, तर काहींनी स्पेशल भेटवस्तू घेतल्या आहेत. कॅम्प, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कोरेगाव पार्क येथे अनेकांनी हॉटेलचे बुकिंग केले आहे. तरुणाईचा व्हॅलेंटाइनसाठी गुलाब बुके आणि चॉकलेट बुके खरेदी करण्याकडे कल आहे. स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. 

व्यावसायिक सुधन्वा जाधव म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छापत्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. भेटवस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. व्हॅलेंटाइन बॉक्‍ससह चॉकलेट बुकेची सर्वाधिक मागणी होती.’’

‘डान्सिंग विथ डिनर...’
कॅम्प, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, कोरेगाव पार्क येथील हॉटेल्स जोडप्यांचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. ‘डान्सिंग विथ डिनर’चा अनोखा पर्यायही अनेकांनी निवडला आहे, तर काहींनी थिमनुसार कॅंडल लाइट डिनरचे प्लॅनिंग केले आहे. काहींनी चित्रपट पाहण्याचे नियोजन केले आहे. गोवा, केरळ, कुलू मनाली यासह लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर अशा ठिकाणी जाऊन ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचेही बेत आहेत. काही जणांनी डेस्टिनेशन सेलिब्रेशनचे बुकिंग केले असून, लाल रंगाच्या थीमनुसार ते सेलिब्रेशन करणार आहेत. 

शुभेच्छापत्रांवर रूपेरी संदेश
प्रेमभावनेच्या शुभेच्छापत्रांना तरुणांची पसंती मिळत आहे. म्युझिकल आणि ॲनिमेटेड शुभेच्छापत्रांसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रेम व्यक्त करणाऱ्या शुभेच्छापत्रांनाही सोशल मीडियाच्या जमान्यात पसंती मिळत आहे. या शुभेच्छापत्रांची किंमत दहा ते १४०० रुपयांपर्यंत आहे.

भेटवस्तूंनी साजरा होणार व्हॅलेंटाइन डे
टेडी बेअरसह फोटो फ्रेम्स, की चेन, घड्याळ, परफ्युम, वॉलेट आणि प्रेमाचे संदेश असलेले प्रिंटेड टी शर्टला मागणी आहे. यंदा  खास ‘व्हॅलेंटाइन बॉक्‍स’ बाजारात आला आहे. त्याची किंमत २ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यात चॉकलेट्‌स, टेडी बेअर आणि विविध भेटवस्तूंचा समावेश आहे. त्यालाही तरुणांकडून मागणी आहे, तर आर्टिफिशिअल रेड रोझ, हार्ट शेप बलून, विविध फ्लेवर्सच्या चॉकलेट बुकेलाही पसंती मिळत आहे. 

Web Title: marathi news pune new valentine day love relation marriage