अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे - व्यावहारिक तर्कशुद्धता, स्वत्वाचा शोध घेत आत्मिक आनंदाची अनुभूती देणाऱ्या सद्‌गुरू यांच्या ‘इनर इंजिनिअरिंग’ या पुस्तकाचा ‘सकाळ प्रकाशना’ने ‘आत्मज्ञानाचे विज्ञान’ या नावाने केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन रविवारी (ता.२८) ‘इशा फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाले.

पुणे - व्यावहारिक तर्कशुद्धता, स्वत्वाचा शोध घेत आत्मिक आनंदाची अनुभूती देणाऱ्या सद्‌गुरू यांच्या ‘इनर इंजिनिअरिंग’ या पुस्तकाचा ‘सकाळ प्रकाशना’ने ‘आत्मज्ञानाचे विज्ञान’ या नावाने केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन रविवारी (ता.२८) ‘इशा फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाले.

पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सद्‌गुरूंनी त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये ‘मिस्टीक आय’ या विषयावर संवाद साधत मनःशांती, अंतर्मनाचा शोध, समाधान, स्वतःची ओळख आणि मानवी स्वभावाची वैशिष्ट्येही सद्‌गुरूंनी उपस्थितांना खास शैलीत उलगडून सांगितले. बालेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात हजारो पुणेकरांनी सद्‌गुरूंच्या प्रवचनाचा लाभ घेतला.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ‘आत्मज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरही याप्रसंगी उपस्थित होते. ‘सकाळ’ या कार्यक्रमासाठी माध्यम प्रायोजक होते.

सद्‌गुरू म्हणाले, ‘‘मनुष्य स्वभावाप्रमाणे अपेक्षा कधीही संपत नाहीत. मात्र, जेव्हा मला काही नको, ही इच्छा उत्पन्न होते, तेव्हा परमेश्‍वराच्या अस्तित्वाची ओळख मनुष्याला होऊ लागते. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात हवा दिसत नाही. तरीही तिची अनुभूती घेता येते. परमेश्‍वराचेही असेच आहे. म्हणूनच तुमच्यातल्या परमेश्‍वराला ओळखायला शिका. मी कोण आहे? आपण कोठून आलो आहोत? आपण या ब्रह्मांडात कोठे आहोत? हे कोणास माहिती आहे का? अंतर्मनाला हा प्रश्‍न विचारल्यास त्यातून स्वतःची ओळख शोधण्याचाही प्रयत्न होईल आणि आत्मविश्‍वासाने आत्मबलही मिळेल. तुम्हीही तुमच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. कारण, तुमचे आयुष्य तुम्हीच घडविणार आहात.’’

सद्‌गुरूलिखित ‘इनर इंजिनिअरिंग’ या न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर पुस्तकाचा ‘आत्मज्ञानाचे विज्ञान’ हा मराठी अनुवाद ‘सकाळ प्रकाशना’ने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक ‘सकाळ’च्या पुण्यातील मुख्य कार्यालयात, तसेच सर्व आवृत्ती कार्यालयांत आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
 ऑनलाइन खरेदीसाठी संपर्क www.sakalpublications.com  किंवा amazon.in 
 मनीऑर्डर/ ड्राफ्ट पाठवण्यासाठी पत्ता- ‘सकाळ प्रकाशन’, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२. 
 अधिक माहितीसाठी संपर्क ८८८८८४९०५०  (कार्यालयीन वेळेत) 

Web Title: marathi news pune New York Times Best Sellers book