मंचरजवळ कार अपघातात नाशिकचे दोनजण ठार

डी. के. वळसे पाटील
रविवार, 4 मार्च 2018

भोरवाडीचा डीवायडर मृत्यूचा सापळा
खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याचे काम भोरवाडी (ता. आंबेगाव) पर्यंत झाले आहे. पुढे मंचरच्या दिशेने जाण्यासाठी लहान रस्ता असून पूल आहे. येथे उतारावर डीवायडर आहे. हा डीवायडर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुणेच्या दिशेने येणारी भरधाव वाहने डीवायडरला धडकून अपघात होतात. दर आठवड्याला किमान दोन ते तीन अपघात येथे होतात.

मंचर : पुणे –नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोरवाडी –अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. ४) कारची डीवायडरला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन जण जागीच ठार झाले आहेत. कार ५० फुट खोल असलेल्या ओढ्यात कोसळून झाडाला अडकली होती. द्राक्ष बागायतदार रमेश नामदेव सोनवणे (वय ५८, रा. खेडगाव, ता. दिंडोरी) व पोलीस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके (वय ५२, रा. कसबे सुकाणे,  ता निफाड) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नवे आहेत.

पुण्याहून नाशिककडे आय २० कार ( एम एच १५, ५१५१) मधून निवृत्ती बाबुराव काश्मीरे (वय ५४, रा. सातपूर नाशिक), ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (वय ५२, आंबेजानोरी, ता. दिंडोरी), सोनवणे व तिडके जात होते. पेठ –अवसरी घाट ओलांडल्यावर भोरवाडी येथे कारच्या समोर अचानकपणे कुत्रे आडवे आले. कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न चालक सोनवणे करत होते. त्यावेळी त्यांचा कार वरील ताबा सुटला. रस्त्यालगत असलेला डीवायडर व लोखंडी फलक तोडून पुलाजवळ असलेल्या ओढ्यातील झाडाला कार अडकली होती. अपघातामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने भोरवाडीचे ग्रामस्थ, शिवसम्राट प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच शिवनेरीहून पुण्याच्या दिशेने शिवज्योत घेऊन जाणारे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले. अपघातस्थळी अंधार होता. अनेकांनी रस्त्यावरील गाड्या थांबवून गाड्यांचा प्रकाश व मोबाईलच्या उजेडात अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना कार मधून बाहेर काढले. एकनाथ भोर, विकास भोर, निलेश एरंडे यांनी जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. रस्त्यातच उपचारापूर्वी सोनावणे व तिडके यांचे निधन झाले. काश्मिरे व वाघ यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सोनवणे यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा व तिडके यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. जखमी ज्ञानेश्वर वाघ यांनी मंचर पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. टी. शिंदे करत आहे.

भोरवाडीचा डीवायडर मृत्यूचा सापळा
खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याचे काम भोरवाडी (ता. आंबेगाव) पर्यंत झाले आहे. पुढे मंचरच्या दिशेने जाण्यासाठी लहान रस्ता असून पूल आहे. येथे उतारावर डीवायडर आहे. हा डीवायडर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुणेच्या दिशेने येणारी भरधाव वाहने डीवायडरला धडकून अपघात होतात. दर आठवड्याला किमान दोन ते तीन अपघात येथे होतात.

डीवायडरचे अंतर कमी केल्यास अपघात टाळता येतील. असे पत्र मंचर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तीन वेळा दिले आहे. गेल्या आठ महिन्यात येथे ५० हून अधिक अपघात झाल्याची नोंद आहे. किरकोळ झालेल्या अपघाताची नोंद चालक करत नाहीत. या अपघातांना व होणाऱ्या मृत्युच्या घटनांना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. याबाबत त्वरित योग्य कार्यवाही न झाल्यास भोरवाडीचे ग्रामस्थ रास्ता आंदोलन करतील. असा इशारा आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य संतोष यमनाजी भोर पाटील यांनी केली आहे.

Web Title: Marathi news Pune news 2 dead in accident