पुणे-सातारा महामार्गावर अपघातात दोघे जागीच ठार

महेंद्र शिंदे
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

संरक्षक कठडे असते तर...
अपघात झाल्या त्याठिकाणी मोरीवर पुल आहे. मात्र दोन्ही रस्त्याच्या मधील ही सुमारे तीस फुट खोलीची मोरी तशीच उघडी आहे. त्याठिकाणी सबंधित ठेकेदाराने संरक्षक कठडे लावले असते तर हा अपघात झाला नसता.

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) येथे मंगळवारी पहाटे चालकाचे नियंत्रण सुटुन मोटरकार रस्त्याच्या मधील मोरीच्या खड्डयात उलटली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी आहेत.

आनंद पुरुषोत्तम सैंदाणे (वय 42, रा. डीएसके विश्व, धायरी, पुणे) आणि वेदांत नितीन जगताप (वय21, रा. दमण, गोवा) अशी या अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. 
तर देवश्री आनंद सैंदाणे (वय34), आयुश्री सैंदाणे (वय 10), आर्यन सैंदाणे (वय 8), सिद्धांत महेंद्र जगताप (वय22) आणि अनिरुद्ध नितीन जगताप (वय 23 वर्ष) हे पाच जण गंभीर जखमी आहेत.

याबाबत शिंदेवाड़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैंदाणे आणि जगताप हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते सर्वजण 23 जानेवारी रोजी मालवण येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये सुट्टीनिमित्त गेले होते. सोमवारी रात्री ते पुण्याकडे परतत होते. यावेळी सिद्धांत जगताप हा गाडी चालवत होता. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शिवरे येथील ओंकार हॉटेल समोर आले असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटुन त्यांची कार रस्त्यामधील मोरीच्या खड्डयात उलटली. 

शिंदेवाड़ी पोलिसांना माहिती मिळताच फौजदार मोहन तलबार, पोलिस हवलदार संतोष शिंदे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले. त्यातील आनंद सैंदाणे आणि वेदांत जगताप हे जागीच ठार झाले. तर बाकीचे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संरक्षक कठडे असते तर...
अपघात झाल्या त्याठिकाणी मोरीवर पुल आहे. मात्र दोन्ही रस्त्याच्या मधील ही सुमारे तीस फुट खोलीची मोरी तशीच उघडी आहे. त्याठिकाणी सबंधित ठेकेदाराने संरक्षक कठडे लावले असते तर हा अपघात झाला नसता.

Web Title: Marathi news Pune news 2 dead in accident