पुणे शेतमाल निर्यातीचे हब होईल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे - पुढील आर्थिक वर्षात शेतीमालाची निर्यात आणि उड्डाण योजनेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत. महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण शेतीमालाच्या निर्यातीपैकी 30 ते 40 टक्के वाटा हा पश्‍चिम महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे शेतमाल निर्यातीचे हब होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पुणे - पुढील आर्थिक वर्षात शेतीमालाची निर्यात आणि उड्डाण योजनेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत. महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण शेतीमालाच्या निर्यातीपैकी 30 ते 40 टक्के वाटा हा पश्‍चिम महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे शेतमाल निर्यातीचे हब होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात हवाई क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. शेतीमालाची निर्यात, मेघा फूड पार्क, पर्यटन आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी "सी प्लेन'च्या वाहतुकीला प्रोत्साहन, उड्डाण योजनेंतर्गत प्रादेशिक विमानतळांच्या सुधारणांना या अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे. त्याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

केंद्राने गेल्यावर्षी उड्डाण या योजनेतंर्गत डिसेंबर 2018 पर्यंत 100 प्रादेशिक विमानतळांची सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील 10 प्रादेशिक विमानतळांच्या सुधारणांची कामे हाती घेतली आहेत. नाशिक, कोल्हापूर, नांदेड आणि जळगाव येथील विमानतळावरून प्रादेशिक हवाई सेवा सुरू झाली आहे. येत्या वर्षात उर्वरित प्रादेशिक विमानतळांचे कामही मार्गी लागणार आहे. त्यामुळे विमानांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय, शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील शेतीमालाची वाहतूक ही मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी येथून होते. एकूण निर्यातीमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतीमालाचे प्रमाण जवळपास 30 ते 40 टक्के आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावर कार्गोची सुविधा सुरू केली आहे, तर पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गोची सुविधा उपलब्ध करणार आहे.

पायाभूत सुविधांची गरज
महाराष्ट्रात मेघा फूड पार्क होणार असल्यामुळे शेतीमाल निर्यातीला चालना मिळणार आहे. या सर्व गोष्टींमुळे पुण्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधा गतीने उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटनवृद्धी आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी "सी प्लेन'च्या वापरास प्राधान्य देण्याचा मनोदय सरकारने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन ठिकाणांना त्यामुळे चांगले दिवस येतील, असा विश्‍वास हवाई क्षेत्रातील विश्‍लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: marathi news pune news agriculture goods export hub