सौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र या तरुणींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी आहे, असे गौरवोद्‌गार पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अजित गाडगीळ व रेणू गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्‍न - सकाळने सुरू केलेला ब्युटी  ऑफ महाराष्ट्र हा उपक्रम कसा आहे?
अजित गाडगीळ -
‘सकाळ’ गेल्या काही दशकांपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असून, त्याचा लाभ हा सर्वांना मिळत आहे. राज्यातील तरुणींमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून सकाळने सुरू केलेला ब्युटी ऑफ महाराष्ट्र हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. कारण हा उपक्रम केवळ तरुणींच्या सौंदर्याशी निगडित नसून त्यांच्या एकूण कलागुणांना वाव देणारा असा आहे.

प्रश्‍न - सकाळने सुरू केलेल्या या उपक्रमाशी आपण कसे जोडले गेलात?
अजित गाडगीळ -
मौल्यवान दागिन्यांच्या व्यवसायामुळे आमचे महिलांशी नाते गेल्या सहा पिढ्यांचे आहे आणि सकाळच्या ब्युटी ऑफ महाराष्ट्र उपक्रमाचा केंद्रबिंदू या तरुणी आहेत. तसेच, हा उपक्रम केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातील अन्य शहरांतून तो होत आहे. आमचीही महाराष्ट्रात अनेक शहरांतून दुकाने असून, तेथील मुली-महिलांशी आमचा संवाद होत असतो. निमशहरी व ग्रामीण भागातील तरुणींमध्येही चांगले गुण असून, तरुणींमधील कलागुणांना या उपक्रमामुळे एक मंच मिळणार आहे. त्यामुळेच आम्ही सकाळच्या या उपक्रमाशी जोडले गेले आहोत. 

प्रश्‍न - या उपक्रमाच्या सामाजिक हेतूबद्दल काय सांगाल?
रेणू गाडगीळ -
सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र ही तरुणींची फक्त सौंदर्य स्पर्धा नाही. यामध्ये तरुणींच्या कौशल्यांचाही कस लागणार आहे. परिणामी त्यांच्यातील कौशल्य अधिक चांगली विकसित होणार असून, त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलणार आहे. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा काही निधी मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमातून मुलींसाठी दुहेरी असा पुढाकार घेण्यात आला असून, तो विधायक आहे. आम्हीही आमच्या दुकानांच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण, सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवीत असतो आणि हे पाठबळ हा त्याच पुढाकाराचा एक भाग आहे.

प्रश्‍न - या उपक्रमाचा मुलींना कसा फायदा होईल?
रेणू गाडगीळ -
शहरापेक्षा निमशहरी व ग्रामीण भागातील मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकास व सक्षमीकरणाची गरज आहे. प्रत्येकालाच पुण्या-मुंबईमध्ये येणे शक्‍य नसते. मुलींना त्यांचे कलागुण, कौशल्य दाखविण्याची संधी स्थानिक पातळीवरच मिळत आहे आणि असा दुहेरी हेतू असणाऱ्या उपक्रमाची राज्य पातळीवर गरज होती आणि ती जागा आता सकाळने भरून काढली आहे. या कार्यक्रमामुळे मिळणाऱ्या प्रशिक्षण व अनुभवाचा फायदा मुलींना नक्की होणार आहे.

Web Title: marathi news pune news ajit gadgil renu gadgil Pu. Na. Gadgil Sakal Beauty of Maharashtra