सायकल सेवा हा महत्त्वाचा उपक्रम

Pune Smart City Cycle Sharing
Pune Smart City Cycle Sharing

पुणे : ''स्मार्ट सिटीच्या नावीन्यपूर्ण योजनांना पुणेकरांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहर स्मार्ट बनविण्यासाठी नव्या कामांपेक्षा समस्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. त्या दृष्टीने 'स्मार्ट सिटी'चा सायकल सेवेचा उपक्रम महत्त्वाचा आहे,'' असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी व्यक्त केले. 

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने (पीएससीडीसीएल) 'पब्लिक बायसिकल शेअरिंग' या सायकल सेवा उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन खडकी कॅंटोन्मेंटमध्ये लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या मालमत्ता विभागाचे मुख्य संचालक एल. के. पेगू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी शिरोळे बोलत होते. कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष अभय सावंत, 'स्मार्ट सिटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, कॅंटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, सुरेश कांबळे, कार्तिकी हिवरकर, कमलेश चासकर, दुर्योधन भापकर, झुमकार पेडलचे व्यवस्थापक आगम गर्ग आदी उपस्थित होते. 

शिरोळे म्हणाले, ''कॅंटोन्मेंटमधील नागरिकांनी सजग राहून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. आपला परिसर प्रदूषणमुक्त व स्मार्ट होण्यासाठी नागरिकांनी सायकल सेवेचा अधिकाधिक उपयोग करावा.'' 

पेगू म्हणाले, ''पुणेकरांनी वाहतुकीची शिस्त लावून सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा मिळवावी. आम्ही त्यास प्रोत्साहन देऊ.'' 

डॉ. जगताप म्हणाले, ''स्मार्ट सिटी योजनेतील क्षेत्र आधारित विकासकामे करताना शहराच्या इतर भागांनाही सोबत घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी खडकी परिसरात काम केल्याने येथील प्रश्‍न माहिती आहेत. त्या दृष्टीने 'स्मार्ट सिटी'अंतर्गत सायकल सेवा उपलब्ध करून देण्याचा कॅंटोन्मेंटचा प्रस्ताव तत्काळ मान्य केला.'' 

खडकीतील 'पेडल सायकल स्टेशन्स' 
खडकी बाजारातील सायकल स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार केंद्रीय विद्यालय, सिंबायोसिस, मिलिटरी हॉस्पिटल, कॅंटोन्मेंट मार्केट, जेसीओ क्वार्टर, खडकी बिझनेस सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कॅंटोन्मेंट कार्यालय, कॅंटोन्मेंट कार्यालयाजवळील मुलींचे वसतिगृह या नऊ ठिकाणी सायकल उपलब्ध होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com