'ग्लॅमर'च्या मोहात पडण्यापेक्षा मेहनत करा : अवधूत गुप्ते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे : ''रियालिटी कार्यक्रमांमुळे आम्हीही घडलो. आज युवा पिढीला यशस्वी होण्याचा हा 'शॉर्टकर्ट' मार्ग मिळाला आहे. हे खरे असले, तरी हे ग्लॅमर प्रत्येकाला झेपावत नाही. एका आठवड्यात पाच हजार रुपयांचे पन्नास हजार रुपये होतात; पण हे ग्लॅमर काही क्षणांपुरतेच असते, हे त्यांनी जाणले पाहिजे. मोहात पडण्यापेक्षा मेहनत करत राहिलात, की खरी वाट सापडेल,'' अशी भावना संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली. 

पुणे : ''रियालिटी कार्यक्रमांमुळे आम्हीही घडलो. आज युवा पिढीला यशस्वी होण्याचा हा 'शॉर्टकर्ट' मार्ग मिळाला आहे. हे खरे असले, तरी हे ग्लॅमर प्रत्येकाला झेपावत नाही. एका आठवड्यात पाच हजार रुपयांचे पन्नास हजार रुपये होतात; पण हे ग्लॅमर काही क्षणांपुरतेच असते, हे त्यांनी जाणले पाहिजे. मोहात पडण्यापेक्षा मेहनत करत राहिलात, की खरी वाट सापडेल,'' अशी भावना संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली. 

श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती- कोथरूड आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातर्फे गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'बहुआयामी गुप्ते' कार्यक्रमात ते बोलत होते. आपला संगीतकार ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास गुप्ते यांनी या वेळी उलगडला. मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. 

संगीताच्या प्रवासाबद्दल गुप्ते म्हणाले, ''पुण्यात आल्यावर आयुष्यात काहीतरी केल्याची जाण होते. करिअर हे नियोजन करून घडले नाही. संगीत क्षेत्रात नकळत आलो. मिठीबाई कॉलेजला आल्यानंतर संगीताची गोडी निर्माण झाली. कॉलेजमध्ये आल्यावर गाण्याशी गट्टी जमली व आपल्यात सूर असल्याचे गवसले. येथेच माझ्यातील संगीतकार मी ओळखला. शब्दांनी मला मोठे केले. माझ्या सुरवातीच्या गाण्यांना लतादीदींचीही दाद मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट ठरली.'' 

करिअरबद्दल ते म्हणाले, ''सुरवातीला आपल्याकडे यश नसते, त्यामुळे मनात येईल ती गोष्ट करण्यात आपण निर्भीड असतो; पण यश आले, की जबाबदारी वाढते आणि त्या ओझ्याखाली आपल्याला जे करायचे आहे, ते करता येत नाही. लोकांच्या अपेक्षाही वाढतात आणि मग आपल्याला स्वतःला सिद्ध करावे लागते. मला पुस्तकांपेक्षा माणसं वाचायला आवडतात. लहानपण ते उतारवय असा माणसाचा प्रवास असतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक कथा दडलेली असते. या प्रवासात अनेक चढ-उतार असतात. तोच प्रवास आपण वाचला पाहिजे.'' 

शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांत एका टप्प्यावर अनेक स्थित्यंतरे सुरू होती. त्यात भरडला जात होता, तो सर्वसामान्य कार्यकर्ता. या कार्यकर्त्याची हीच बाजू मी जवळून पाहत होतो. याच कार्यकर्त्याचे दुःख मांडण्यासाठी मी 'झेंडा' चित्रपट काढला. पण त्यासाठी मला मोठा संघर्ष करावा लागला. बंदूकधारी माणसे आजूबाजूला फिरकत होती. असेही जगणे असते, हे या अनुभवातून शिकायला मिळाले. इतक्‍या संघर्षातून हा चित्रपट आकाराला आला याचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नर्तिकेचे दुःख अजूनही लोकांना कळले नाही! 
'ऐका दाजीबा' हे गाणे मला बसमधून जाताना सहज सुचले. या गाण्यात एका नर्तिकेचे दुःख आणि वेदना मी त्यात मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे बहुतेक कोणालाही माहीत नाही. लाखो लोक या गाण्यावर नाचले आणि त्यांनी ठेका धरला. आजही ते गाणे गाजतेय; पण नर्तिकेचे दुःख त्यात मांडले होते, हे आजही लोकांना कळलेले नाही. अशोक सराफ हे माझ्यासाठी प्रेरणास्थानच नाही, तर एक सच्चा हिरो आहेत. आयुष्य कसे जगावे हे मी त्यांच्याकडून शिकलो,'' असेही अवधूत गुप्ते यांनी सांगितले.

Web Title: marathi news Pune News Avdhoot Gupte Reality Shows