बारामती-पुणे प्रवास करणाऱ्या महिलांचे कमालीचे हाल

मिलिंद संगई
बुधवार, 7 मार्च 2018

एका थांब्याचीही गरज.....
बारामतीहून पुण्याला जाताना जेजुरी व सासवडच्या मध्ये आणि पुण्याहून निघाल्यावर जेजुरीनजिक एक पाच मिनिटांचा थांबा महिलांच्या दृष्टीने गरजेचा असल्याचे अनेक महिलांचे मत आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्थित सोय असलेल्या ठिकाणी हा थांबा दिल्यास अनेक महिलांसाठी तो योग्य निर्णय होईल. अडीच तासांच्या प्रवासात महिलांचे अनेकदा हाल होतात, त्या मुळे एसटी प्रशासनाने याचाही विचार करावा अशी महिलांची मागणी आहे. 

बारामती : येथून राज्य परिवहन मंडळाच्या एसटीने बारामती-पुणे-बारामती प्रवास करणा-या महिलांचे दररोज कमालीचे हाल होतात. महिलांसाठी तिकीटांची स्वतंत्र रांग नसल्याने आणि अनेकदा महिलांच्या जागांवर पुरुषांचे होणारे आक्रमण या मुळे महिलांची कमालीची कुचंबणा होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त एसटीच्या वतीने महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी व महिलांच्या जागेवर महिलांनाच बसण्याचा हक्क या दोन गोष्टी मिळाव्यात अशी महिलांची मागणी आहे. 

बारामतीहून पुण्याला व पुण्याहून बारामतीला विनावाहक विनाथांबा दररोज जवळपास 44 गाड्या प्रवास करतात. सकाळी व संध्याकाळी बारामती व स्वारगेट या दोन्ही स्थानकांवर या गाडयांसाठी तिकीट काढण्यासाठी प्रचंड गर्दी असते. तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना किमान अर्धा तास रांगेत थांबावेच लागते ही स्थिती रोजचीच आहे. गाड्या व चालकांच्या अपु-या संख्येचे गणित बारामती आगाराला जुळतच नसल्याने प्रवाशांचे दररोज नित्यनेमाने कमालीचे हाल होतात. 
या प्रवाशात निम्म्याहून अधिक महिला व युवती असतात. त्यांनाही या रांगेत थांबून धक्काबुक्कीत तिकीटे मिळविण्याशिवाय पर्यायच नसतो. अनेकदा त्यांना महिलांसाठी राखीव आसनांवरील तिकीटे मिळत नाहीत अनेकदा शेवटच्या बाकांवर तिकीट मिळाल्याने दाटीवाटीत अंग चोरुन अडीच तास बसण्याची शिक्षा अनेक महिला दररोज भोगतात. अनेकदा दोन पुरुषांच्या मधली सीट मिळण्याची शिक्षाही या महिलांना मिळते, त्या मुळे त्यांचे हाल होतात.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती व स्वारगेट या दोन्ही बसस्थानकांवर महिलांसाठी तिकीटांची स्वतंत्र रांग करावी, महिलांशेजारी महिलांनाच तिकीट द्यावे, एक पुरुष व एक महिला असे तिकीट वाटप केल्यास महिलांचे दररोज होणारे हाल व त्यांची प्रवासातील कुचंबणा थांबेल, अशी मागणी होत आहे. 

एका थांब्याचीही गरज.....
बारामतीहून पुण्याला जाताना जेजुरी व सासवडच्या मध्ये आणि पुण्याहून निघाल्यावर जेजुरीनजिक एक पाच मिनिटांचा थांबा महिलांच्या दृष्टीने गरजेचा असल्याचे अनेक महिलांचे मत आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्थित सोय असलेल्या ठिकाणी हा थांबा दिल्यास अनेक महिलांसाठी तो योग्य निर्णय होईल. अडीच तासांच्या प्रवासात महिलांचे अनेकदा हाल होतात, त्या मुळे एसटी प्रशासनाने याचाही विचार करावा अशी महिलांची मागणी आहे. 

Web Title: Marathi news Pune news Baramati Pune st